काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर टीका करताना दहशतवादी मसुद अझरचा उल्लेख मसुद अझरजी असा केला आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. मसुद अझर हा दहशतवादी आहे त्याला राहुल गांधी हे जी असं संबोधन कसं काय लावू शकतात असा प्रश्न निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. भाजपा नेत्यांनी आता राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

काय म्हटले राहुल गांधी?
भाषण करत असताना राहुल गांधी हे अजित डोवाल यांच्यावर टीका करत होते. अजित डोवाल हे आपल्या देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत मग ते विमानात बसून मसुद अझरजींना सोडवण्यास कसे गेले होते? असं म्हणत राहुल गांधी यांनी मसुद अझरचा उल्लेख जी असा आदरार्थी केला.

पहा व्हिडिओ

यानंतर राहुल गांधींवर टीकेचे ताशेरे झडण्यास सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोलताना आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर टीका करताना राहुल गांधी यांनी ताळतंत्र सोडल्याची टीका भाजपा नेत्यांकडून होते आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही राहुल गांधी आणि पाकिस्तान या दोघांमध्ये एक साम्य आहे असे म्हटले आहे. ते साम्य म्हणजे दहशतवाद्यांबद्दल वाटणारे प्रेम आहे असे ट्विट स्मृती इराणी यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर राहुल गांधी टीका करायला गेले खरे मात्र दहशतवाद्याचा उल्लेख जी असा आदरार्थी केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. मसुद अझर हा जैश ए मोहम्मदचा म्होरक्या आहे.  पुलवामा हल्ला याच दहशतवादी संघटनेने घडवला होता.