नवी दिल्ली : महात्मा गांधी यांची हत्या रा. स्व. संघाने केली, असा आरोप करणाऱ्या निवेदनाबाबत खेद व्यक्त करून आपल्याविरुद्धचा बदनामीचा खटला संपवण्याची सर्वोच्च न्यायालयाची सूचना स्वीकारण्यास काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नकार दिला. आपण हा खटला लढवू, असे त्यांनी न्यायालयाला सांगितले.

या प्रकरणी राहुल गांधींविरुद्ध ठाणे जिल्ह्य़ातील भिवंडीच्या न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर प्रलंबित असलेल्या फौजदारी कार्यवाहीला देण्यात आलेला अंतरिम स्थगनादेश कायम ठेवण्यासही न्या. दीपक मिश्रा व न्या. प्रफुल्लचंद्र पंत यांच्या खंडपीठाने संमती दिली.

तुम्हाला हे प्रकरण संपवायचे असेल, तर आम्ही एक प्रस्ताव ठेवतो. याचिकेवरील सुनावणीदरम्यान अनेक सूचना करण्यात आल्या. राहुल गांधी यांनी तीव्र खेद व्यक्त केला, तरच आपण तडजोड करू, असे प्रतिवादी व संघाचे स्वयंसेवक राजेश कुंटे यांच्या वकिलांनी म्हटले आहे. तुम्हाला हे मान्य असल्यास हा मुद्दा मर्यादशीर मार्गाने सोडवला जाऊ शकतो, असे खंडपीठ म्हणाले.