पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे. काही दिवसापूर्वी मोदींनी परदेशातील तज्ज्ञांशी बोलताना पवन चक्क्यांच्या माध्यमातून ऊर्जेबरोबर पिण्याचं स्वच्छ पाणी आणि ऑक्सिजनही मिळू शकतो का यासंदर्भात भाष्य केलं. मात्र यावरुनच राहुल गांधींनी मोदींना समजत नाही यापेक्षा ‘तुम्हाला समजत नाही’ असं सांगण्याची हिंमत त्यांच्या आजूबाजूचे लोक करत नाहीत. हेच देशासाठी अधिक धोकादायक आहे, असा टोला ट्विटरवरुन लगावला आहे. यासाठी संदर्भ देताना राहुल यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये मोदी पवन चक्क्यांपासून पाणी आणि ऑक्सिजन निर्मितीबद्दल बोलताना दिसत आहेत.

व्हिडीओमध्ये काय आहे?

पवन चक्क्यांसंदर्भात पंतप्रधान मोदींनी डेन्मार्कमधील एका अधिकाऱ्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या चर्चा केली. यावेळेस बोलताना मोदींनी पवन चक्क्यांच्या मदतीने पाण्यातील बाष्प जमा करुन त्यापासून पिण्याचे स्वच्छ पाणी निर्माण करता आल्यास किनारपट्टीच्या प्रदेशात असणारा पाण्याचा प्रश्न सोडवता येईल. तसेच दुसरा महत्वाचा मुद्दामध्ये पवन चक्क्यांच्या मदतीने ऑक्सिजन वेगळा काढता आला तरी फायद्याचं होईल असं मोदी म्हणाले. हे कदाचित शास्त्रज्ञांसाठी आव्हानात्मक ठरु शकते मात्र असं काही तुम्हाला करता येईल का?, यासंदर्भात तुमचा काय विचार आहे असा प्रश्न मोदींनी या तज्ज्ञाला विचारला.

डेन्मार्कमधील अधिकारी म्हणाला…

मोदींचा प्रश्न ऐकताना मी हसत होतो असं डेन्मार्कमधील अधिकाऱ्याने सांगितलं. तुमचा उत्साह आणि प्रश्न ऐकून मला आनंद वाटला. मात्र तुम्हाला कधी डेन्मार्कला भेट देण्याची संधी मिळाली किंवा योग जुळून आलाच तर यासंदर्भातील आमचं काम आम्ही तुम्हाला दाखवू असं या अधिकाऱ्याने सांगितले.

राहुल यांचा टोला

मोदी आणि डेन्मार्कमधील अधिकाऱ्यामधील चर्चेचा हा व्हिडीओ शेअर करत राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली आहे. “पंतप्रधानांना समजत नाही ही भारतासाठी जास्त धोकादायक नसून त्यांच्या आजूबाजूचे लोकांना त्यांना तुम्हाला समजत नाही हे सांगण्याची हिंमत करत नाहीत हा आहे,” असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

या पुर्वीही पंतप्रधानांनी एका कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना गटारामध्ये गॅसची नळी टाकून एका चहावाल्याने गॅसचा वापर दुकान चालवण्यासाठी केल्याचा दावा केला होता. त्यावेळीही विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली होती. आता त्याचपद्धतीने काँग्रेसने मोदींना लक्ष्य केलं आहे.