नवी दिल्ली : उद्योगपती अनिल अंबानी यांना हवाई दलाच्या ३० हजार कोटी रुपयांची चोरी करू देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच दरवाजा खुला केल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी केला.

राफेल विमान खरेदी व्यवहारात भ्रष्टाचारविरोधी कलमांना बगल देण्यात आल्याच्या एका इंग्रजी दैनिकातील वृत्ताच्या अनुषंगाने राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर तोफ डागली. केंद्र सरकारविरोधात उपोषणास बसलेले आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची आंध्र भवनमध्ये भेट घेतल्यानंतर राहुल यांनी पंतप्रधानांना लक्ष्य केले. पंतप्रधानांनी देशातील लोकांचे पैसे चोरले आणि ते उद्योगपती अंबानींना दिले, असा आरोप राहुल यांनी केला. दरम्यान, सरकार आणि अनिल अंबानी यांनी काँग्रेसचे आरोप फेटाळले आहेत.

आपण भ्रष्टाचाराशी लढणार असल्याचे सांगून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. मात्र, पंतप्रधानांनी आंध्र प्रदेशातील लोकांचे पैसे चोरून ते अनिल अंबानींना दिले, असा आरोप केला. अनिल अंबानींना ३० हजार कोटींची चोरी करता यावी, म्हणून पहारेकऱ्याने स्वतच दार उघडले, असे ट्विटही राहुल यांनी केले आहे. पहारेकरीच चोर आहे हे अतिशय स्पष्ट आहे, आहे, असे राहुल म्हणाले.

कोणी कोणाला लाच दिली?

काँग्रेसनेही या संदर्भात पत्रकार परिषद घेतली. पक्षाचे प्रवक्ते मनीष तिवारी म्हणाले, ‘‘राफेल खरेदी करारात भ्रष्टाचारविरोधी कलमांना बगल का दिली गेली? या मूलभूत प्रश्नाचे राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने द्यावे. ते उत्तर सोपे आहे. या व्यवहारात भ्रष्टाचार होता म्हणून भ्रष्टाचारविषयक कलमांना वगळण्यात आले.’’ राफेल व्यवहारात कोणीतरी कोणाला तरी पैसे दिले आहेत, हे स्पष्ट आहे. त्यामुळे ते कोण आहेत, त्याची चौकशी संयुक्त संसदीय समितीमार्फत करण्यात यावी, अशी मागणीही तिवारी यांनी केली.

..तर कॅगचा अहवाल निर्थक!

महालेखापालांचा (कॅग) अहवाल मंगळवारी मांडला जाण्याची शक्यता आहे. त्यात राफेल व्यवहारात झालेल्या भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष केले असेल तर त्या अहवालाला काहीही अर्थ उरणार नाही, याकडे आम्ही पुन्हा लक्ष वेधत असल्याचेही मनीष तिवारी यांनी सांगितले.