पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जो कुणी आवाज उठवतो, त्यांच्या मनाविरुद्ध बोलतो त्याला या देशात काही स्थानच राहिले नाही असे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले. अलवार येथे गायी नेत असताना एका मुस्लिम व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. रमजान ईद येणार म्हणून दुभत्या गायी आणण्यासाठी पेहलू खान राजस्थानमध्ये आला होता. त्याची गैरसमजातून हत्या करण्यात आली. त्यावर राहुल यांनी भाष्य केले. देशात केवळ एक प्रकारची विचारधारा असावी असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मोदींचा उद्दिष्ट आहे असे गांधी यांनी म्हटले.

त्यामुळे त्यांच्या विचारांव्यतिरिक्त जो कुणी दुसरे काही बोलतो किंवा वागतो तेव्हा त्याचा विरोध केला जातो, त्याला देशातून बाहेर चालता हो असे म्हटले जाते असे राहुल यांनी म्हटले. अलवार येथे घडलेली घटना ही लज्जास्पद आहे असे ते म्हणाले. या गोष्टीचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असे राहुल यांनी म्हटले. हा हल्ला संवेदनाहीन आहे असे ते म्हणाले. सरकारने आपली जबाबदारी झटकली आहे असे ते म्हणाले. जेव्हा जमावाकडून लोकांची हत्या केली जाते तेव्हा सरकारचे नियंत्रण नाही असा संदेश जातो. देशातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे याचे ते निदर्शक आहे असे राहुल यांनी म्हटले. भारतातील वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघत आहे असे ते म्हणाले.

पेहलू खान याच्या हत्येमुळे पुन्हा एकदा सहिष्णुता आणि असहिष्णुता हा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. पेहलू खान हा गायींची तस्करी करणारा नव्हता तर दुभदुभत्याचा व्यवसाय करणारा होता. त्याची हत्या होण्याच्या दोनच दिवस आधी गुजरातने गोहत्या करणाऱ्या व्यक्तीला जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद होईल असा कायदा मंजूर केला होता. तर उत्तर प्रदेशामध्ये बेकायदा कत्तलखाने बंद केले जात आहेत. त्यामुळे तेथील मांस व्यावसायिकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. लखनौमधील टुंडे कबाब हे प्रसिद्ध कबाब देखील मांसाच्या कमतरतेमुळे बंद पडले आहे.