मुझफ्फरनगर येथील दंगलीचा फटका बसलेल्या व सध्या छावण्यांत राहात असलेल्या लोकांनी परत त्यांच्या निवासस्थानी जावे, कारण जातीय दंगली घडवणाऱ्यांना हेच हवे आह़े  लोक घरी न गेल्यास त्यांचे फावेल, असा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी केला. मुझफ्फरनगर व शामली येथील छावण्यात चार हजार लोक वास्तव्यास असून, दंगलखोरांवर कारवाई केल्याशिवाय आम्ही परत जाणार नाही असे त्यांचे म्हणणे आहे.
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील दंगलग्रस्तांच्या भेटी घेतल्या. दंगलग्रस्त राहत असलेल्या निवासी छावण्यांमध्ये जाऊन राहुल गांधी यांनी त्यांच्याशी चर्चा केली. दंगलग्रस्तांना पुन्हा आपल्या घरी जाता यावे यासाठी मदत करण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे.
या भेटीदरम्यान काही दंगलग्रस्तांनी काळे झेंडे दाखवून राहुलविरोधी घोषणा दिल्या. राहुल शामली येथील निवासी छावणीमध्ये गेले असता काही मुस्लिम तरुणांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. राहुल गांधी दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करून शांततेचा भंग करत आहेत, असा आरोप तेथील दंगलग्रस्तांनी केला. निवासी छावण्यांमध्ये कोणतीही मदत मिळत नसल्याचेही त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाच्या सरकारनेच काँग्रेसला बदनाम करण्यासाठी ही घोषणाबाजी घडवून आणली, असा आरोप काँग्रेसतर्फे करण्यात आला आहे. गांधी यांची मुझफ्फरनगरमधील ही दुसरी भेट आहे.
‘सीआयआय’कडून भाषणाचे कौतुक
राहुल गांधी यांनी शनिवारी दिल्लीत उद्योगविश्वावर केलेल्या भाषणाचे ‘भारतीय उद्योग संघटने’कडून (सीआयआय) स्वागत करण्यात आले आहे. राहुल यांनी उद्योगविश्वातील योग्य मुद्दय़ांना स्पर्श केला. त्यांचे भाषण उद्योजक आणि गुंतवणूकदारांसाठी प्रेरणादायी होते, असे सीआयआयचे अध्यक्ष क्रिस गोपालकृष्णन म्हणाल़े