मागील अनेक दिवसांपासून देशातील राजकीय चर्चेमधील मुद्दा असणाऱ्या पुद्दुचेरीत आज काँग्रेसचे सरकार पडले. आठवड्याभरातील अनेक राजकीय घडामोडी घडलेल्या पुद्दुचेरीत काँग्रेसचं सरकार आज बहुत सिद्ध न करु शकल्याने पडलं. रविवारी काँग्रेसप्रणीत सत्तारुढ आघाडीतील दोन आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर सोमवारी झालेल्या बहुमत चाचणीमध्ये काँग्रेसला बहुमत सिद्ध करण्यात यश आलं नाही. मुख्यमंत्री व्ही नारायणस्वामी यांनी राजीनामा दिला असून पदुच्चेरीत जे काही सुरु आहे तो राजकीय वेश्याव्यवसाय असल्याची टीका केलीय. मात्र पुद्दुचेरीत काँग्रेसला हा धक्का बसल्यामुळे निवडणुकीआधीच काँग्रेसच्या हातून आणखीन एक राज्य गेलं आहे. असं असतानाच आता या राजकीय संघर्षावरुन टीका टिप्पणी केली जात आहे. त्यातच भाजपाचे नेते आणि आयटी सेलचे राष्ट्रीय प्रमुख असणाऱ्या अमित मालवीय यांनी काँग्रेसला बहुतम सिद्ध न करता आल्यानंतर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना ट्विटरवरुन टोला लगावला आहे.

नक्की वाचा >> पुद्दुचेरीही गेल्याने काँग्रेस उरली पाच राज्यांपुरती तर भाजपाची या २० राज्यांमध्ये सत्तेत

पुद्दुचेरीमधील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवरच राहुल गांधी हे पुद्दुचेरीच्या दौऱ्यावर असण्यावरुन मालवीय यांनी एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी राहुल यांच्या पायगुणामुळेच काँग्रेसचं सरकार पडल्याचा टोला लगावला आहे. “राहुल गांधी पुद्दुचेरीला गेले आणि त्यांनी त्यांच्या मिडास टचमुळे या केंद्रशासित प्रदेशामधील काँग्रेसचं सरकार पाडलं,” असं ट्विट मालवीय यांनी केलं आहे.

काँग्रेस आणि द्रमुकच्या प्रत्येकी एक आमदाराच्या राजीनाम्याने ३३ सदस्य असलेल्या विधानसभेत सत्तारुढ काँग्रेस आघाडीचे संख्याबळ ११ पर्यंत घसरलं होतं. विरोधी आघाडीकडे १४ सदस्य, तर सात जागा रिक्त आहेत. यामुळे नारायणस्वामी यांच्या सरकारवर बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली होती. पण विश्वासदर्शक ठरावात बहुमत सिद्द न करता आल्याने काँग्रेसचं सरकार कोसळलं आहे. यामुळे आता पुद्दुचेरीही काँग्रेसच्या हातून गेल्याने केवळ पाच राज्यांमध्ये काँग्रेस सत्तेत आहे. यापैकीही पंजाब आणि छत्तीसगड या दोन राज्यांमध्ये काँग्रेसची एकहाती सत्ता असून राजस्थान, महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये काँग्रेस युतीमध्ये सत्तेत आहे.