द्वेषाचे राजकारण केले की त्याचा संपूर्ण देशावर परिणाम होतो. गुजरातमध्ये सध्या त्याचेच परिणाम पाहायला मिळताहेत, असे सांगत कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. कॉंग्रेस पक्ष सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्यावर विश्वास ठेवतो आणि समाजामध्ये बंधुभावाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, असेही त्यांनी सांगितले.
पटेल समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून गुजरातमधील आंदोलनाला मंगळवार रात्री हिंसक वळण लागले. राज्यात अनेक ठिकाणी जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली. आजही गुजरातच्या अनेक भागांमध्ये संचारबंदी लागू आहे. या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच राहुल गांधी यांनी या हिंसक आंदोलनावर प्रतिक्रिया दिली. राहुल गांधी सध्या तीन दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱयावर आहेत. यावेळी एका सभेमध्ये बोलताना त्यांनी जम्मू-काश्मीरमधील पीडीपी-भाजपच्या आघाडी सरकारवरही टीका केली. हे सरकार संधीसाधूंचे असून, त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी आघाडी केली आहे. राज्यातील लोकांना मदत करण्यात त्यांना काहीही स्वारस्य नसल्याचे राहुल गांधी म्हणाले. केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार केवळ २-३ व्यावसायिकांसाठी चालवले जाते आहे. देशातील शेतकऱयांचे प्रश्न एकसारखे असताना त्यावर सरकारकडून काहीच उपाय केला जात नसल्याबद्दलही त्यांनी टीका केली.