चीन संघर्ष आणि आर्थिक धोरणांवरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी साडेतीन मिनिटांच्या चित्रफितीद्वारे केंद्र सरकारवर पुन्हा टीका केली. अर्थव्यवस्थेतील घसरण, शेजारी राष्ट्रांशी दुरावलेपण, परराष्ट्र धोरणातील कमकुवतपणा हे मोदी सरकारचे अपयश हेरून चीन भारताविरोधात आक्रमक झाला असल्याची टिप्पणी राहुल गांधी यांनी केली.

चीन हा भारताविरोधात आत्ताच का आक्रमक झाला? आपण आक्रमक होण्याचे धाडस दाखवू शकतो असे चीनला का वाटले? गेल्या सहा वर्षांमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या चुकीच्या धोरणांमुळे भारताला कमकुवत बनवले आहे. निव्वळ शब्दांचा खेळ करून भौगोलिक राजकारण करता येत नाही, अशी टीका राहुल यांनी केली.

आता भारताचे परराष्ट्र संबंध म्हणजे निव्वळ व्यवहार राहिलेला आहे. अमेरिका असो वा युरोप या देशांशी संबंध असेच व्यवहारावर आधारलेले आहेत.

रशियाशी असलेले चांगले संबंध बिघडले आहेत. चांगले परराष्ट्र संबंध, संरक्षण अर्थव्यवस्था देशाचे संरक्षण करत असते. देशवासीयांच्या भावभावना, दृष्टिकोन देशाची सुरक्षा करतात, पण गेल्या सहा वर्षांत मोदी सरकारने या सगळ्यालाच धक्का लावला आहे. यापूर्वी पाकिस्तान वगळता नेपाळ, भूतान, श्रीलंका हे शेजारी राष्ट्रे भारताचे मित्र होते. आज नेपाळ आपल्यावर रागावलेला आहे.

श्रीलंकेने त्यांचे बंदर चीनला देऊन टाकले आहे. आपण शेजारी मित्र राष्ट्रांना अस्वस्थ केले आहे, असेही राहुल यांनी ध्वनिफितीत म्हटले आहे. अर्थव्यवस्थेत पैशाचा पुरवठा व्हायला हवा, पण केंद्र सरकारने त्यासंदर्भात कोणतेही पाऊल उचललेले नाही, असेही राहुल म्हणाले.

लोकांच्या हातात थेट पैसे देण्याची मागणी सातत्याने काँग्रेसच्या वतीने केली गेली आहे.