देशातली सध्याची परिस्थिती पाहता देशात आता संपूर्ण लॉकडाउन लागू करणं हा एकमेव पर्याय असल्याचं ट्विट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही वेळापूर्वीच केलं होतं. मात्र, आता त्यांनी एक नवं ट्विट करुन आपण असं का म्हणालो याबद्दलचं स्पष्टीकरण दिलं आहे.

आपल्या नव्या ट्विटमध्ये राहुल म्हणतात, मला फक्त हे सांगायचं आहे की, “भारत सरकारकडे कसलीही रणनीती नसल्याने आता लॉकडाउन हा एकमेव पर्याय उरला आहे. त्यांनी विषाणूला रोखण्याऐवजी या टप्प्यावर पोहोचण्यास सक्रियपणे मदत केली. हा भारताविरुद्धचा एक गुन्हाच आहे”.

काही वेळापूर्वीच राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमधून भारत सरकारला सल्ला दिला होता. या ट्विटमध्ये ते म्हणतात, “आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात,भारत सरकारला हे लक्षात येत नाहीये की, या वेळी करोनाची ही लाट रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाउन हा एकमेव उपाय आहे. मात्र, समाजातल्या काही घटकांना न्याय (NYAY) योजनेचा लाभ घेता यायला हवा. भारत सरकारची निष्क्रियता अनेक निष्पाप लोकांचा बळी घेत आहे”.

राहुल गांधी यांनी आत्तापर्यंत लॉकडाउनचा विरोधच केला आहे. गेल्या वर्षी जेव्हा सरकारने लॉकडाउन लागू केला होता त्यावेळी राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली होती. राहुल यांनी या आधी बऱ्याचदा सांगितलं होतं की लॉकडाउनमुळे फक्त करोना प्रसाराचा वेग कमी होतो, त्यामुळे करोनाचा नायनाट होणार नाही. मात्र, आता राहुल यांनी स्वतःहून लॉकडाउन करण्याचा सल्ला दिला आहे.