राहुल गांधी यांचे टीकास्त्र; तर लहान बाळाची उपमा देत भाजपचे प्रत्युत्तर
बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात करताना शनिवारी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. म. गांधीजींनी गरिबांसाठी सूट-बूट बाजूला ठेवले होते, तर मोदी सूट-बुटातील काही लोकांच्या हितासाठीच काम करीत आहेत, असे गांधी म्हणाले.

आपण चहाविक्रेते होतो असे म्हणणारे मोदी पंतप्रधान झाल्यावर १५ लाख रुपये किमतीचा सूट परिधान करतात, असे राहुल गांधी एका जाहीर सभेत म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त सभा आयोजित करण्यात आली होती.या सभेचे औचित्य साधून राहुल गांधी यांनी बिहारमधील जद(यू), राजद आणि काँग्रेस आघाडीच्या प्रचाराचा नारळ फोडला. बिहार विधानसभेच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर आघाडीच्या वतीने करण्यात आलेले हे पहिलेच शक्तिप्रदर्शन होते.
राहुल गांधी यांच्या जाहीर सभेला नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव गैरहजर असले, तरी के. सी. त्यागी आणि तेजस्वी यादव यांनी या दोन्ही नेत्यांच्या पक्षांचे प्रतिनिधित्व केले. त्यापूर्वी पाटणा विमानतळावर नितीशकुमार यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली.

‘त्यांना गांभीर्याने घेत नाही’
नवी दिल्ली: काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे लहान बाळ आहेत त्यामुळे त्यांच्या पक्षातील किंवा आघाडीतील पक्ष त्यांचे म्हणणे गंभीरपणे घेत नाहीत आणि त्यामुळेच त्यांना पक्षाचे अध्यक्ष करण्यात आले नाही, अशी टीका भाजपने केली आहे. बिहारमधील जाहीर सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. राहुल गांधी यांना जद(यू) आणि राजदही त्यांच्याकडे गांभीर्याने घेत नाही, असे भाजपचे नेते श्रीकांत शर्मा म्हणाले.

जद(यू) आमदार सतीशकुमार भाजपमध्ये
नवी दिल्ली: बिहार विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने जोरदार प्रचार सुरू केला असतानाच शनिवारी जद(यू)चे विद्यमान आमदार सतीशकुमार यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने सत्तारूढ पक्षाला झटका बसला आहे. गेल्या निवडणुकीत सतीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी राबडीदेवी यांचा राघोपूर मतदारसंघात पराभव केला होता.