लॉकडाउनच्या काळात स्थलांतरित मजुरांचा प्रश्न चिघळला. रेल्वेतून प्रवास करताना अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत्या. जेवण आणि पाणी न मिळाल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयानंही स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नात लक्ष घातलं आहे. दरम्यान, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वेसंदर्भात करण्यात आलेल्या सगळ्या आरोपांना उत्तर दिली आहेत. यात एकाही प्रवाशाचा अन्न-पाण्यावाचून मृत्यू झालेला नाही, असा त्यांनी केला आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारनं देशात लॉकडाउन लागू केला. २१ दिवसांच्या पहिल्या लॉकडाउनमध्ये सर्व व्यवहार ठप्प झाले. त्यामुळे देशभरात विविध राज्यात काम करत असणाऱ्या मजुरांनी घराकडे स्थलांतर करण्यास सुरूवात केली. पायीच घरी जाणाऱ्या अनेक मजुरांना रस्त्यातच जीव गमवावा लागला. त्यामुळे सरकारनं लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरू होण्यापूर्वी विशेष श्रमिक रेल्वे गाड्या सुरू केल्या. या गाड्यांमध्ये ८० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याचा दावा राजकीय नेत्यांकडून करण्यात येत आहे. रेल्वेसंदर्भात होत असलेल्या आरोपांना रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी उत्तर दिली आहेत.

पीयूष गोयल यांनी एक ट्विट करून भाष्य केलं आहे. “देशात कोणत्याही रेल्वेगाडीला पोहोचण्यासाठी ७ वा ९ दिवस लागलेले नाहीत. त्याचबरोबर एकाही प्रवाशाचा मृत्यू जेवण अथवा पाणी न मिळाल्यान झालेला नाही. रेल्वे प्रवाशांना १.९ कोटी रूपयांपेक्षा अधिक जेवण व १.५ कोटी रुपयांपेक्षा जास्त पाण्याच्या बॉटल रेल्वेद्वारे पुरवण्यात आले. रेल्वे मार्गातील अडथळ्यांमुळे काही रेल्वेगाड्या वळवण्यात आल्या. ज्याचं प्रमाण एकूण रेल्वेगाड्यांच्या तुलनेत १.७५ टक्के इतकंच आहे,” असा दावा गोयल यांनी केला आहे.

केंद्र सरकारनं मजुरांना घरी सोडण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष श्रमिक रेल्वेगाड्या सध्या चर्चेत आहेत. या गाड्यांमध्ये मजुरांना खाण्यापिण्याची व्यवस्था नसल्याचा आरोप राजकीय नेत्यांनी केला होता. दहा दिवसांमध्ये या रेल्वेगाड्यांमध्ये ८० मजुरांचा मृत्यू झाल्याचा दावा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केला होता.