रेल्वे मंडळ अध्यक्षांचे आदेश जारी

रेल्वेच्या चहा कपांवर ‘मैं भी चौकीदार’च्या जाहिराती करून तिकिटांवरही पंतप्रधान मोदी यांची छायाचित्रे छापल्याच्या प्रकरणी गंभीर दखल घेण्यात आली असून रेल्वे मंडळाचे अध्यक्ष व्ही. के.यादव यांनी रेल्वेच्या आवारातील सर्व राजकीय जाहिराती काढून टाकण्यास सांगितले आहे. आचारसंहितेचे उल्लंघन करीत रेल्वेने भाजपचा प्रचार केल्याचे दिसून आले होते.

रेल्वे मंडळ अध्यक्षांनी सर्व विभागीय रेल्वे महाव्यवस्थापकांना संदेश पाठवून रेल्वे तिकिटांवर पंतप्रधान मोदी यांची छायाचित्रे का छापली याबाबत स्पष्टीकरण करण्यास सांगितले आहे. आचारसंहिता लागू असताना अशी छायाचित्रे छापणे चुकीचे होते, अशी टीका करण्यात आली होती. दोनच दिवसांपूर्वी भाजप प्रचार मोहिमेतील मैं भी चौकीदार ही घोषणा रेल्वेच्या चहा कपांवर छापण्यात आल्याबाबत टीका झाली होती. रेल्वे व्यवस्थापकांनी कुठल्याही राजकीय नेत्यांची जाहिरात तिकिटे, रेल्वे स्टेशन, रेल्वे स्टेशनरी या कुठल्याही माध्यमातून केली असेल, तर ती काढून टाकावी, असे रेल्वे मंडळाच्या अध्यक्षांनी म्हटले आहे.

निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी शनिवारी सांगितले होते, की घडलेल्या प्रकारांबाबत रेल्वेला स्पष्टीकरण करण्यास वेळ देण्यात आला आहे. सत्तारुढ पक्ष रेल्वेचा वापर निवडणूक जाहिरातीसाठी करीत आहे, त्यामुळे सत्तेवरील पक्षाला लागू असलेले कलम येथे विचारात घेण्यात आले आहे. आयआरसीटीसीची परवानगी न घेता कपांवर मैं भी चौकीदार घोषणा छापण्यात आली. त्याबाबत सेवा पुरवठादाराला १ लाख रुपये दंड करण्यात आला आहे. शिवाय कारणे दाखवा नोटीसही देण्यात आली आहे. कथगोदाम शताब्दी गाडीत प्रवाशांना हे कप देण्यात आले होते.