रेल्वेतून लहान बाळांसह प्रवास करणाऱ्यांना आता एका क्लिकवर गरम उपलब्ध होणार आहे. रेलयात्री अॅप्लिकेशनच्या माध्यमातून रेल्वे प्रवाशांना दूध उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. रेल्वे प्रवाशांना न सांडणाऱ्या पॅकेट्समधून दूध उपलब्ध करुन दिले जाणार आहे. त्यामुळे तान्ह्या बाळासह प्रवास प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. रेलयात्री अॅप्लिकेशनच्या माध्यमातून प्रवाशांना गरम दूध मागवता येणार आहे.

‘तान्ह्या बाळासह रेल्वे प्रवास करताना प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. वेळेवर दूध न मिळाल्यास तान्ह्या बाळांना रडू येते. यामुळे बाळाच्या आईलादेखील वेदना होतात. हीच बाब लक्षात घेऊन आम्ही तान्ह्या बाळांसाठी आरोग्यदायी आणि गरम दूध उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे,’ अशी माहिती ‘रेलयात्री.इन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक मनिष राठी यांनी दिली आहे.

‘रेलयात्री.इन’च्या सर्वेक्षणात जवळपास ८०% घटनांमध्ये रेल्वेला तान्ह्या बाळांना दूध पुरवण्यात अपयश येत असल्याचे आढळून आले होते.
रेल्वे प्रवासात अनेकदा जेवण वेळेवर मिळत नाहीत, असेदेखील रेलयात्री.इनच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. ‘अनेकदा रेल्वे प्रवासात तान्ह्या बाळासह प्रवास करणारे प्रवासी सोबत दूध आणि खाद्यपदार्थ सोबत घेऊन जातात. मात्र रेल्वेला उशीर झाल्यास अनेकदा दूध उपलब्ध होत नाही. हीच गोष्ट विचारात घेऊन आम्ही तान्ह्या मुलांसह प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गरम दूध उपलब्ध करुन देणार आहोत,’ अशी माहिती मनिष राठी यांनी दिली आहे.

रेलयात्री अॅप्लिकेशनच्या माध्यमातून मागवले जाणारे दूध प्रवाशांना त्यांच्या आसनस्थळी आणून दिले जाणार आहे. यासाठी प्रवाशांना त्यांच्या जागेवरुन उठण्याची आवश्यकता भासणार नाही.