धूम्रपानासाठी कायदेशीर वयाची अट अधिक कठोर केल्यास ही सवय कमी होऊन आरोग्याला होणारी हानीही घटेल, असे मत अमेरिकी तज्ज्ञांच्या एका पाहणीत मांडले गेले आहे.  तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करू देण्यासाठी वेगवेगळ्या देशांत कमीत कमी वयाची अट वेगवेगळी आहे. हे वय १९ वरून २१ वर नेले तर सिगारेट सेवनाचे प्रमाण बरेच कमी होऊ शकते. मात्र ते २१ वरून २५ वर नेले तर पडणारा फरक तुलनेने कमी असेल, असे मत या तज्ज्ञांनी मांडले.   
माणसाची आकलनक्षमता वयाच्या १६व्या वर्षांपर्यंत विकसित झालेली असते. पण निर्णयक्षमता, आवेगात निर्णय घेण्याची वृत्ती, मित्रपरिवाराच्या दबावाखाली मते बनवणे अशा मेंदूशी संबंधित अन्य क्रियांवर नियंत्रण प्राप्त करण्यास सामान्य व्यक्तीला वयाची पंचविशी यावी लागते. त्या वयापर्यंत जर कायद्याचे नियंत्रण ठेवून तंबाखूजन्य पदार्थापासून व्यक्तीला दूर ठेवले तर पुढे व्यसन लागण्याची शक्यता कमी होईल, असे या पाहणीच्या निष्कर्षांत म्हटले आहे.