वडिलांनी दुसरे लग्न करु नये यासाठी दोघा बहिणींनी सरकारी रुग्णालयातून बाळ चोरल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी शिवानी देवी (२३) आणि प्रियंका देवी (२०) या दोघींना अटक केली आहे. पोलीस बाळाचा शोध घेत असल्याचे समजल्याने घाबरलेल्या महिलांनी बाळाला रस्त्यालगत सोडून दिले होते.

‘हिंदूस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार उत्तर प्रदेशमधील मथुरा जिल्ह्यात राहणाऱ्या शिवानी देवी आणि प्रियंका देवी या दोघींच्या भावाचा दोन वर्षांपूर्वी मृत्यू झाला. त्यांचा भाऊ १२ वर्षांचा होता. मुलाच्या मृत्यूनंतर वडिलांनी दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला. वडिलांनी आईला सो़डून दुसरे लग्न करु नये यासाठी शिवानी आणि प्रियंका या दोघींनी रुग्णालयातून बाळ चोरण्याचा कट रचला. बाळ चोरण्यासाठी दोघी राजस्थानमध्ये गेल्या. भरतपूरमधील विविध रुग्णालयांची त्यांनी रेकीदेखील केली. याच दरम्यान दोघींनी बाळ दत्तक घेण्याचा प्रयत्नही केला. मात्र त्यात अपयश आले. मग त्यांनी रुग्णालयातील नर्सेसशी संपर्क साधला. गरीब दाम्पत्याकडून बाळ विकत घेण्याची तयारीही त्यांनी दर्शवली. मात्र नर्सेसने कठोर कायदे आणि पोलीस कारवाईची भीती यामुळे यात सहकार्य करण्यास नकार दिला. शेवटी त्यांनी भरतपूरमधील रुग्णालयातील एका दाम्पत्याचे बाळ चोरी करण्याचे ठरवले. १० जानेवारी रोजी पहाटे मनिष यांच्या पत्नीने सरकारी रुग्णालयात बाळाला जन्म दिला. या दोघींनी मनिष यांचे बाळ चोरी केले. मनिष यांची पत्नी झोपली असताना त्यांनी बाळ चोरले.

सरकारी रुग्णालयातून बाळ चोरीला गेल्याने राजस्थानमध्ये खळबळ उडाली. सीसीटीव्हीत दोन महिलांनी बाळ पळवल्याचे निदर्शनास आले. पोलीस महिलांचा शोध घेत असल्याचे शिवानीने वर्तमानपत्रात वाचले. यामुळे दोघी घाबरल्या आणि त्यांनी तीन दिवसांनी परिसरातील निर्जनस्थळी बाळ सोडून घेतले. त्यांनी बाळाजवळ एक चिठ्ठी देखील ठेवली. ‘१० जानेवारीला सरकारी रुग्णालयातून हे बाळ चोरले असून ज्याला हे बाळ दिसेल त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी’ असे त्यांनी चिठ्ठीत लिहीले होते. बाळाला आई-वडिलांकडे परत देण्यात आले असले तरी पोलिसांनी तपास सुरुच ठेवला. सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी उत्तर प्रदेशमधील दोघींना अटक केली. शिवानी ही शिक्षिका असून तिची बहीण ही कला शाखेत पदवी घेत आहे.