राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना राहुल गांधी एकमेव पर्याय असल्याचं म्हटलं आहे. लोकसभेत झालेल्या दारुण पराभवानंतरही राहुल गांधी यांनी चांगली कामगिरी केली असून, नरेंद्र मोदींविरोधात राहुल गांधी एकमेव पर्याय असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना धैर्याने आणि निर्भयपणे सामोरे जाणारे राहुल गांधी एकमेव विरोधी नेते आहेत.

अशोक गेहलोत यांनी यावेळी काँग्रेसमध्ये कौटुंबिक राजकारण सुरु असल्याचा आरोप यावेळी त्यांनी फेटाळून लावला. २०१९ लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतही राहुल गांधी पुढे आले असल्याचं सांगत यावेळी त्यांनी कौतुक केलं. “राहुल गांधी यांनी शेतकरी, तरुण, बेरोजगारी, वाढती महागाई सारखे महत्त्वाचे मुद्दे प्रचारादरम्यान उपस्थित केल्याचं,” यावेळी अशोक गेहलोत यांनी सांगितलं.

“नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाला पर्याय नाही असं म्हणणं चुकीचं आहे. राहुल गांधी पर्याय आहेत. हे खरं आहे की, मोदींची स्टाइल आणि दृष्टीकोन वेगळा असल्याने लोक राहुल गांधींशी लगेच जोडले जात नाहीत हे खरं आहे,” असं यावेळी अशोक गेहलोत यांनी सांगितलं. राहुल गांधी यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे २०१७ गुजरात निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्याचं अशोक गेहलोत यांनी म्हटलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भावनिक मोहीम चालवली असं सांगत अशोक गेहलोत यांनी मोदी निवडणूक जिंकण्यासाठी काहीही करु शकतात असा आरोप केला. राहुल गांधी यांनी निवडणुकीच्या प्रचारात उपस्थित केलेले मुद्दे सर्जिकल स्ट्राइक आणि राष्ट्रभक्तीसमोर दुर्लक्षित करण्यात आले अशी खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली.

“राहुल गांधी यांना शेतकरी, तरुण, बेरोजगारी आणि महागाईच्या मुद्द्यांवर लोक समर्थन करतील असं वाटलं होतं. पण मुख्य मुद्द्यांना बगल देत सर्जिकल स्ट्राइक तसंच राष्ट्रभक्तीचे मुद्दे उपस्थित करण्यात आले. काँग्रेसला मुस्लिम पक्ष म्हणून हिणवण्यात आलं. आम्ही देशभक्त नाही का?,” अशी विचारणा अशोक गेहलोत यांनी केली आहे.

“महाराष्ट्र आणि हरियाणामधील निकालानंतर भाजपाने काँग्रेसमुक्त भारताचा नारा देणं बंद केलं आहे. महाराष्ट्रात विलक्षण परिस्थितीत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं असून ते शेवटपर्यंत टिकेल,” असा विश्वास अशोक गेहलोत यांनी व्यक्त केला आहे.