राजस्थानच्या गंगापूरमध्ये एका घरात खराब ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरचा स्फोट झाल्याने महिलेचा मृत्यू झाला आहे. तर पती गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आयएएस अधिकारी हर सहाय मीणा यांचा भाऊ सुल्तान सिंह याला करोनाची लागण झाली. त्यानंतर त्यांना गेल्या दोन महिन्यांपासून श्वास घेण्यास त्रास होत आहे. त्यासाठी ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरची व्यवस्था करण्यात आली होती. सुल्तान सिंह यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. त्यांची पत्नी संतोष मीणा त्यांची देखभाल करत होती. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. संतोष मीणा यांनी नेहमीप्रमाण शनिवारी ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर ऑन केला आणि त्याचा स्फोट झाला. मशिनमधून ऑक्सिजन गळती होत असल्याने ही दुर्घटना झाल्याचं बोललं जात आहे.

स्फोटानंतर संपूर्ण घरात आग पसरली. दोघांचा आरडाओरडीचा आवाज ऐकल्यानंतर आसपासच्या लोकांनी तात्काळ धाव घेत दोघांना बाहेर काढलं. मात्र या आगीत दोघंही होरपळून निघाले होते. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच संतोष मीणा यांचा मृत्यू झाला. तर सुल्तान सिंह या आगीत गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना जयपूरमधील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दांमत्याची दोन्ही मुलं दुर्घटनेवेळी बाहेर असल्याने सुखरुप आहेत. एका मुलाचं वय १० वर्ष आणि दुसऱ्याचं वय १२ वर्ष इतकं आहे. संतोष मीणा या कन्याशाळेत मुख्याध्यापक होत्या.

Corona Update : करोना रुग्णांची आकडेवारी वाढली; देशात ४१ हजार १५७ नवे रुग्ण!

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरचा पुरवठा करणाऱ्या दुकानदाराची चौकशी करत आहेत. अजूनही स्फोटाचं कारण अस्पष्ट आहे.