विरोधी पक्षांना भाजपा धोकादायक पक्ष वाटत असेल तर तसे असेलही असे विधान काल अभिनेते रजनीकांत यांनी केले होते. त्यावर रजनीकांत यांनी मंगळवारी स्पष्टीकरण दिले. सत्ताधारी पक्ष भाजपा धोकादायक आहे किंवा नाही ते जनताच ठरवेल असे रजनीकांत पोस गार्डन येथील निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सर्व विरोधी पक्ष भाजपा विरोधात एकत्र येत आहेत. भाजपा धोकादायक पक्ष आहे का ? असा प्रश्न मला काल विचारण्यात आला होता. त्यावर मी विरोधी पक्षांना तसे वाटत असेल तर तसे असेलही असे म्हटले होते. विरोधी पक्षांसाठी भाजपा धोकादायक पक्ष आहे. मला त्यावर माझे व्यक्तीगत मत द्यायचे नाही असे रजनीकांत यांनी सांगितले.

जेव्हा या मुद्यावरुन पत्रकारांनी जास्त भर दिला तेव्हा त्यांनी वेगळया पद्धतीने उत्तर दिले. जेव्हा १० लोक एका विरुद्ध एकत्र येतात तेव्हा बलवान कोण झाला ? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. मी अजून पूर्णपणे राजकारणात उतरलेलो नाही. त्यामुळे मी माझे व्यक्तीगत मत देणार नाही असे त्यांनी सांगितले.

काय म्हणाले होते रजनीकांत
अन्य पक्षांना भाजपा धोकादायक पक्ष वाटत असेल तर तसे असेलही असे मत रजनीकांत यांनी सोमवारी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयासंदर्भातही त्यांची भूमिका बदलली आहे. आधी व्यवस्थित रिसर्च करुन नंतर अंमलबजावणीचा निर्णय घ्यायला हवा होता असे मत त्यांनी व्यक्त केले. चेन्नई विमानतळाबाहेर ते पत्रकारांशी बोलत होते.

नोटाबंदीचा निर्णय योग्य रिसर्च करुन घ्यायला हवा होता. अंमलबजावणीमध्ये चूक झाली असे रजनीकांत म्हणाले. दोन वर्षांपूर्वी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर रजनीकांत यांनी टि्वटरवरुन त्यांचे कौतुक केले होते. आता मात्र त्यांनी निर्णय चुकल्याचे म्हटले आहे.