थलैवा म्हणजेच रजनीकांत यांनी ३१ डिसेंबर रोजी राजकीय पक्षाची घोषणा करत राजकारणात प्रवेश केला. आता ते चॅनेलही लाँच करणार असल्याची माहिती समोर आली आहे. जयललिता आणि एम. करुणानिधी यांच्या निधनानंतर तामिळनाडूत राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे ही राजकीय पोकळी भरुन काढण्याची संधी रजनीकांत यांच्याकडे आहे. आपल्या टीव्ही चॅनेलच्या माध्यमातून त्यांना यासाठी मदत होईल असे बोलले जात आहे. आपला राजकीय पक्ष तामिळनाडूतील आगामी निवडणूका लढवेल असे सुप्रसिद्ध स्टार रजनीकांत यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केले होते. मात्र, २०१९ च्या निवडणुका लढवायच्या की नाही हे आम्ही निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर ठरवू असेही त्यांनी सांगितले होते.

आता ते टीव्ही चॅनेलच्या क्षेत्रात आणखी एक चॅनेल काढणार असून यावर बातम्या आणि मनोरंजन अशा दोन्ही गोष्टी असतील. या चॅनलबाबतच्या तांत्रिक गोष्टी पूर्ण झाल्या असून त्यासाठी आवश्यक असणारे प्रमाणपत्रही रजनीकांत यांना मिळाले आहे. या चॅनेलसाठी रजनी टीव्ही, सुपरस्टार टीव्ही, थलैवार टीव्ही यांसारखी काही नावे सुचवण्यात आली आहेत. ट्रेडमार्क रजिस्टर करण्यासाठी प्राथमिक पातळीवर ही नावे पाठवण्यात आली असून अद्याप यातले कोणतेच नाव निश्चित झालेले नाही. तामिळनाडूमध्ये राजकारण्यांकडून चॅनेल काढण्याची परंपरा अतिशय जुनी आहे. याबाबत रजनिकांत म्हणाले, माझे नाव आणि फोटो लोगोमध्ये वापरण्यास परवानगी मिळाली आहे, त्याप्रमाणे पुढील प्रक्रिया सुरु असून लवकरच हे चॅनेल सुरु करण्यात येईल.