सध्या जगभरात आणि देशात करोना विषाणूनं थैमान घातलं आहे. करोना विषाणूवरील लसींवर अनेक देशांमध्ये सध्या संशोधन सुरू आहे. काही कंपन्या या लसींच्या अंतिम टप्प्याच्या जवळही पोहोचल्या आहे. परंतु देशातील उद्योजक राजीव बजाज यांनी या लसीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. “१०० टक्के अनिवार्य होईपर्यंत मी करोनाची लस घेणार नाही,” असं वक्तव्य राजीव बजाज यांनी केलं आहे. ईटी नाऊला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

“१०० टक्के अनिवार्य होईपर्यंत मी करोनाची लस घेणार नाही. ही नवी लस आहे आणि घाईघाईत ती तयाक केली जात आहे. ती सर्वात अखेरची गोष्ट असेल जी मी घेईन,” असं बजाज म्हणाले. होमियोपॅथी. योग आणि सोशल डिस्टन्सिंगवर आपला सर्वाधिक विश्वास आहे आणि त्याचं पालन आपण करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. यावेळी त्यांनी देशातील तरूण आणि उत्तम आरोग्य असलेल्या नागरिकांना करोनाची भीती घालवण्याचं आवाहन केलं.

आणखी वाचा- Good News : भारतातील ऑक्सफर्ड लसीच्या दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीचा मार्ग मोकळा

“निरनिराळ्या जागी आणि ठिकाणी लॉकडाउन करण्याऐवजी सरकारनं २० ते ६० वर्षांमधील तंदुरूस्त असलेल्या लोकांना सामान्य पद्धतीनं आपलं कामकाज करू द्यावं,” असंही ते म्हणाले. यापूर्वी त्यांनी करोना संकटाचा सामना करण्यासाठी लागू करण्यात आलेलं लॉकडाउन हे कठोर असल्याचं म्हटलं होतं. भारतानं पश्चिमेकडील देशांचं अनुकरण करत देशात लॉकडाउन लागू करण्याचा प्रयत्न केला. असं असलं तरी करोनाचा प्रसार मात्र थांबला नाही आणि देशाचा जीडीपीही खाली आला. याव्यतिरिक्त देशाच्या अर्थव्यवस्थेलाही याचा मोठा फटका बसल्याचं ते काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या चर्चेदरम्यान म्हणाले होते.