आयसिसकडून भारतीय तरूणांना आपल्या जाळ्यात ओढण्याच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी दिल्लीत मुस्लिम धर्मगुरूंच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. मुस्लिम तरूणांमधील आयसिसच्या प्रसारावर नजर ठेवण्यासाठी राजनाथ सिंह यांनी मुस्लिम धर्मगुरूंकडे सहकार्याची मागणी केली. तब्बल तासभर सुरू असलेल्या या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल आणि गृह मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. यावेळी आयसिस भारतीय मुस्लिमांना जाळ्यात ओढण्यासाठी कशाप्रकारे प्रयत्न करत आहे, याबद्दल मुस्लिम धर्मगुरूंना माहिती देण्यात आली. मुस्लिम धर्मगुरूंनीही यावेळी राजनाथ यांच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत भारतात आयसिसचा प्रसार रोखण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. आयसिससंदर्भात चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांनी मुस्लिम धर्मगुरूंची भेट घेण्याची ही पहिलीच घटना आहे. यावेळी बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, भारतीय परंपरा आणि कौटुंबिक मुल्यांच्या सहाय्याने अशा प्रकारच्या दहशतवादी प्रयत्न हाणून पाडता येतील. भारतातील आयसिसचा प्रभाव सध्याच्या घडीला खूपच मर्यादित आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारतातील आयसिसचा प्रभाव फारच मामुली आहे. मात्र, तरीही सुरक्षेत कोणताही हयगय न होता सर्व आघाड्यांवर नजर ठेवण्याची आवश्यकता असल्याचे राजनाथ सिंह यांनी म्हटले.
याशिवाय, बैठकीत समाज माध्यमांचा गैरवापर, अल्पसंख्य घटकांसाठी कल्याणकारी योजना, तरूणांना आयसिसकडे आकृष्ट करणारे घटक, शेजारील देशांतील आयसिसचा वाढता प्रभाव आणि हे सगळे रोखण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी कशी करता येईल, आदी मुद्द्यांबाबतही चर्चा करण्यात आली.