19 January 2018

News Flash

राजनाथ यांची राजकीय वाटचाल..

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका आणि पक्षाला अंतर्गत कलहामुळे ग्रासलेले असतानाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते राजनाथसिंह यांची बुधवारी निवड

, नवी दिल्ली | Updated: January 24, 2013 2:06 AM

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका आणि पक्षाला अंतर्गत कलहामुळे ग्रासलेले असतानाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते राजनाथसिंह यांची बुधवारी निवड झाली. मावळते अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याकडून त्यांनी पक्षाची सूत्रे स्वीकारली. डिसेंबर २००९ मध्ये राजनाथ यांनीच पक्षाची सूत्रे गडकरी यांच्याकडे सुपूर्द केली होती.
* भौतिकशास्त्राचे प्राध्यापक असलेल्या राजनाथ यांचा राजकीय क्षेत्रातील उदय अत्यंत साधेपणाने झाला. २००६ ते २००९ या कालावधीत ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. दोनदा केंद्रीय मंत्री आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषवून त्यांनी त्यांच्यातील कुशल प्रशासकाचे दर्शन घडविले होते. सध्या ते लोकसभेत उत्तर प्रदेशातील गाझियाबादचे प्रतिनिधित्व करीत आहेत. तथापि, २००९ मध्ये त्यांना पक्षाला सत्तेवर आणता तर आलेच नाही, उलटपक्षी २००४च्या तुलनेत भाजपच्या २२ जागा कमी झाल्या.
* राजनाथ यांचा जन्म १० जुलै १९५१ रोजी उत्तर प्रदेशातील चंडौली जिल्ह्य़ातील भाभौरा गावात झाला. गोरखपूर विद्यापीठातून त्यांनी एमएससीची (भौतिकशास्त्र) पदवी प्राप्त केली. मिर्झापूर येथील महाविद्यालयात त्यांची भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नेमणूक करण्यात आली.
* त्यानंतर एकेक पायरी वर चढत त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. १९६९मध्ये ते अभाविपचे संघटन सचिव म्हणून काम पाहू लागले. आणीबाणीच्या काळात सिंग यांनी जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीत भाग घेतला आणि १९७५ मध्ये त्यांना अटक झाली व १९७७ मध्ये त्यांची कारागृहातून सुटका झाली. उत्तर प्रदेशातील निवडणुकीत १९७७मध्ये आमदार म्हणून निवडून आले. १९८६ मध्ये ते भाजयुमोचे राष्ट्रीय सरचिटणीस झाले, तर १९८८ मध्ये अध्यक्ष झाले.
* कल्याणसिंह यांच्या मंत्रिमंडळात ते शिक्षणमंत्री होते. त्यावेळी कॉपीविरोधी कायद्यामुळे मोठा वादंग निर्माण झाला होता. उत्तर प्रदेशातील राजकारणात स्थिर होतानाच त्यांनी १९९४ मध्ये संसदेत प्रवेश केला. त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आणि पक्षाच्या मुख्य प्रतोदाचीही जबाबदारी देण्यात आली. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात ते भूपृष्ठ वाहतूकमंत्री होते. त्यानंतर २०००मध्ये राजनाथ सिंग उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर समाजवादी पार्टी आणि बसपा यांच्यापुढे पक्ष निष्प्रभ होत चालला. बसपाला पाठिंबा देण्याचा निर्णय पक्षाने घेतल्यानंतर ते राष्ट्रीय राजकारणात परतले. त्यानंतर ते वायपेयी मंत्रिमंडळात कृषिमंत्री झाले.
* त्यानंतर ३१ डिसेंबर २००५ रोजी ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. त्यांच्याच राजवटीत दक्षिणेकडील राज्य असलेल्या कर्नाटकात भाजपचा झेंडा फडकला. आता पुन्हा एकदा त्यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा आली असून पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पक्षांतर्गत कलह यांचे त्यांच्यापुढे आव्हान आहे.

First Published on January 24, 2013 2:06 am

Web Title: rajnath political journey
टॅग Bjp,Rajnath Singh
  1. No Comments.