नवी दिल्ली : पंजाबमधील अमृतसर येथे निरंकारी भवनात करण्यात आलेल्या बॉम्बहल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी देशातील सुरक्षेचा आढावा घेतला असून त्यात पंजाबवर विशेष लक्ष कें द्रित करण्यात आले. गृह मंत्रालय व सुरक्षासंस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजनाथ सिंह यांना रविवारी अमृतसर येथे निरंकारी भवनात करण्यात आलेल्या बॉम्ब हल्ल्यातील तपशिलाची माहिती दिली. पोलिसांनी हा सकृतदर्शनी दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे.

अधिकाऱ्यांनी चौकशीत पंजाब सरकारला सहकार्य करावे, असे आदेश राजनाथ सिंह यांनी यावेळी दिले. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) पथक घटनास्थळी गेले असून स्फोटक तज्ज्ञही पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती राजनाथ सिंह यांना देण्यात आली.

या स्फोटात तीन  ठार तर वीस जण जखमी झाले होते. मोटारसायकलवरून आलेले  दोन हल्लेखोर निरंकारी भवनात एका महिला रक्षकाला बंदुकीचा धाक दाखवून आत घुसले. अमृतसरमध्ये राजसान्सी नजीक अदलीवाल खेडय़ात निरंकारी भवनच्या प्रार्थना सभागृहात जाऊन हल्लेखोरांनी हातबॉम्ब फेकले त्यात तीन ठार तर वीस जण जखमी झाले अशी माहिती पोलिसांनी दिली. हल्ला झाला त्यावेळी निरंकारी अनुयायांची प्रार्थना सभा घेण्यात येत होती. संत निरंकारी मिशन ही आध्यात्मिक संस्था असून अमृतसर आंतरराष्ट्रीय विमानतळ व भारत पाक सीमेनजीक निरंकारी भवन आहे.

पाकिस्तानातील बॉम्बचा वापर?

अमृतसर : अमृतसरमधील निरंकारी भवनावर रविवारी हल्लेखोरांनी फेकलेले बॉम्ब हे पाकिस्तानच्या सैन्यामध्ये वापरले जातात, असा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. हल्लेखोरांनी फेकलले बॉम्ब एचई-३६ मालिकेतील असून अशा प्रकारचे बॉम्ब पाकिस्तान सैन्यदलामध्ये वापरले जातात. हे बॉम्ब फेकल्यानंतर धूर येतो आणि त्यानंतर मोठा स्फोट होतो, असे तपास यंत्रणांकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे संशयाची सुई पाकिस्तानकडे वळली आहे.

हल्लेखोरांची माहिती देणाऱ्यास ५० लाखांचे इनाम

चंडीगड : पंजाबमध्ये अमृतसर येथे राजसान्सी विमानतळ व भारत-पाक सीमेजवळ असलेल्या निरंकारी भवनात रविवारी करण्यात आलेल्या हातबॉम्ब हल्ल्यात सामील असेलल्यांबाबत महत्त्वाची माहिती देणाऱ्यास मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी पन्नास लाख रुपयांचे इनाम जाहीर केले आहे. या हल्ल्यात तीन ठार, तर वीसजण जखमी झाले होते.

पंजाब पोलिसांच्या १८१ या दूरध्वनी क्रमांकावर कुणीही या  हल्ल्याबाबत महत्त्वाची माहिती देऊ शकते. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी सोमवारी घटनास्थळी भेट दिली. ते भेट देणार असल्याने निरंकारी भवन येथे सुरुवातीला लाल गालिचा त्यांच्या स्वागतासाठी अंथरण्यात आला होता, पण दु:खद घटना घडली असताना लाल गालिचा अंथरून मुख्यमंत्र्यांचे स्वागत होत असल्याबाबत नाराजीचा सूर येताच हिरवा गालिचा अंथरण्यात आला.