पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्कराने बुधवारी पहाटे केलेल्या हल्ल्यानंतर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी देशातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. तासाभराच्या बैठकीस देशाच्या संरक्षण दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सीमा सुरक्षा दलाच्या छावण्यांवर जर हल्ले झाले तर त्याला तोंड देणे व सीमावर्ती भागात राहणाऱ्या लोकांचे संरक्षण करणे हे दोन उद्देश प्रमुख आहेत असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

सीमेवरील जवानानी सतत सतर्क राहण्याची गरज आहे व तशी दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी, कारण बुधवारी पहाटे करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर भारत-पाक सीमेवरील परिस्थिती काहीशी अस्थिर आहे असे त्यांनी सांगितले. सीमा सुरक्षा दलाने त्यांच्या सर्व तुकडय़ा सतर्क ठेवल्या आहेत. जम्मू, पंजाब, राजस्थान, गुजरात या राज्यांलगतच्या पाकिस्तानी सीमेवर गुप्तचरांना सतर्क करण्यात आले आहे. सीमा सुरक्षा दलाने सीमेवरील नागरिकांच्या हालचालींवर नियंत्रणे आणली आहेत. सीमेवरील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी स्थानिक प्रशासनास सीमा सुरक्षा दलाने मदत करावी असे सांगण्यात आले आहे. भारताने प्रत्यक्ष ताबा रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी छावण्यांवर हल्ले केले होते. अकरा दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या जैश ए महंमद या संघटनेच्या दहशतवाद्यांनी काश्मीरमधील उरी येथे लष्करी तळावर केलेल्या हल्ल्यात १९ जवान हुतात्मा झाले होते.