सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाचा ठराव; देशाच्या सार्वभौमत्त्वाबाबत तडजोड नको

जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती सुधारण्याकरिता सर्व संबंधितांशी संवाद साधण्यासाठी पावले उचलावीत, अशी सूचना सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाने केंद्र आणि राज्य सरकारला बुधवारी केली आहे. मात्र, देशाच्या सार्वभौमत्वाच्या मुद्यावर तडजोड करता येणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळाने स्पष्ट केले.

हिज्बुल मुजाहिदीनचा दहशतवादी बुरहान वानीला सुरक्षा दलांनी ठार केल्याच्या पाश्र्चभूमीवर दोन महिन्यांपासून काश्मीरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब सुरू आहे. काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सीताराम येचुरी, शरद यादव, असदुद्दीन ओसेवी, डी. राजा यांच्यासह २४ खासदारांच्या शिष्टमंडळाने ४ आणि ५ सप्टेंबरला जम्मू-काश्मीरमधील राजकीय पक्ष-संघटनांशी चर्चा केली. मात्र, काही फुटीरवाद्यांनी शिष्टमंडळास भेट नाकारली. या दोन दिवसीय दौऱ्यानंतर शिष्टमंडळाने बुधवारी बैठक घेतली. काश्मीरमधील मुद्दे संवाद आणि चर्चेने सोडवता येतील, असे स्पष्ट करत शिष्टमंडळाने जनतेला हिंसाचाराचा मार्ग सोडण्याचे आवाहन केले.

जम्मू-काश्मीरमधील शैक्षणिक संस्था, सरकारी कार्यालये आणि आस्थापने लवकरात लवकर सुरळीतपणे सुरू करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी सूचना शिष्टमंडळाने केंद्र आणि राज्य सरकारला केली. सरकारने सर्व नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेण्याबरोबरच हिंसाचारात जखमी झालेले सुरक्षा दलांचे कर्मचारी आणि नागरिकांना वैद्यकीय उपचाराची सोय करावी, असेही शिष्टमंडळाने म्हटले आहे. काश्मीरमधील जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी छऱ्र्याच्या बंदुकांवर बंदी आणण्याबरोबरच जखमींना वैद्यकीय सुविधा पुरविणे आणि सुरक्षा दलांकडून अधिकारांचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारींबाबत चौकशी करणे या उपाययोजना सूचविल्याचे सीताराम येचुरी यांनी शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर सांगितले.

 

पाक राजदूताकडे भारताची नाराजी

नवी दिल्ली : भारताचे पाकिस्तानातील उच्चायुक्त गौतम बंबावले यांना अवमानकारक वागणूक दिल्याप्रकरणी भारताने बुधवारी पाकिस्तानचे भारतातील राजदूत अब्दुल बसीत यांना ‘साउथ ब्लॉक’मध्ये बोलावून जाब विचारला. बंबावले यांचा कराचीतील कार्यक्रम ऐनवेळी रद्द करण्याच्या पाकिस्तानच्या उद्दाम वर्तनाबाबत परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिव सुजाता मेहता यांनी बसीत यांना खडेबोल सुनावले. या प्रकरणामुळे भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंधात आणखी कटुता निर्माण झाली आहे.

गौतम बंबावले यांना कराची चेंबर ऑफ कॉमर्सच्या मंगळवारच्या कार्यक्रमात बोलण्यासाठी दोन आठवडय़ांपूर्वी निमंत्रित करण्यात आले होते. जानेवारी २०१६ मध्ये भारताचे पाकिस्तानातील उच्चायुक्त म्हणून रुजू झालेले बंबावले या कार्यक्रमानिमित्त पहिल्यांदाच कराचीत जाणार होते. मात्र, हा कार्यक्रम रद्द केल्याचे बंबावले यांना कार्यक्रमाच्या अध्र्या तासाआधी सांगण्यात आले. त्यासाठी कोणतेही कारण देण्यात आलेले नाही. काश्मीरच्या मुद्दय़ावर हस्तक्षेप करू नये, असे बंबावले यांनी सोमवारी काश्मीरला सुनावले होते. त्यामुळेच हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे मानले जाते.

 

मानवी हक्क उल्लंघनाचा पाकचा कांगावा

इस्लामाबाद : काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा पाकिस्तानने प्रयत्न सुरू केला असून त्याचा एक भाग म्हणून पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या विशेष दूताने जिनिव्हामध्ये मानवी हक्क परिषदेचे अध्यक्ष आणि आयसीआरसीचे अध्यक्ष यांची भेट घेतली आणि काश्मीरमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा कांगावा त्यांच्यासमोर केला.

पाकिस्तानच्या राष्ट्रीय असेंब्लीच्या परराष्ट्र व्यवहार स्थायी समितीचे अध्यक्ष असदार अवैस अहमद खान लेघारी हे सध्या शरीफ यांचे विशेष दूत म्हणून जिनिव्हा भेटीवर आले आहेत. काश्मीरमध्ये मोठय़ा प्रमाणावर मानवी हक्कांची पायमल्ली होत असल्याचा कांगावा लेघारी यांनी मंगळवारी जिनिव्हा आंतरराष्ट्रीय समुदायासमोर केला.मानवी हक्क परिषदेचे अध्यक्ष, आयसीआरसीचे अध्यक्ष आणि अन्य राजदूतांची भेट घेऊन लेघारी यांनी काश्मीरमधील जनतेवर लष्कराकडून अत्याचार केले जात आहेत, असे सांगितल्याचे एका निवेदनात म्हटले आहे.

शांततापूर्ण मार्गाने निदर्शने करणाऱ्यांवर पेलेट गनने मारा केल्याने अनेकांची दृष्टी गेली असल्याचा मुद्दाही या वेळी अधोरेखित करण्यात आला.

  • काश्मीरमधील लोकांवर गोळ्यांचा वर्षांव करून तो प्रश्न सुटणार नाही, काश्मीर ही पाकिस्तानची जीवनरेषा आहे, असे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख राहील शरीफ यांनी संरक्षण दिनाच्या कार्यक्रमात रावळपिंडी येथे सांगितले.

 

दहशतवाद्यांवर कारवाईची अमेरिकेची पाकला सूचना

वॉशिंग्टन : दहशतवादी गटांविरुद्ध कोणतीही कारवाई करीत नसल्याबद्दल  पाकिस्तानवर र्निबध लादण्याचा अमेरिकेचा विचार नाही, मात्र पाकिस्तानने शेजारी देशाला लक्ष्य करणाऱ्या गटांसह सर्व दहशतवादी गटांवर कारवाई करावी, असे अमरिकेने स्पष्ट केले आहे.

पाकिस्तानवर र्निबध लादण्याचा अमेरिकेचा सध्या तरी कोणताही विचार नाही, असे परराष्ट्र विभागाचे उपप्रवक्ते मार्क टोनर यांनी स्पष्ट केले.

 

 ‘लोकांवर गोळ्यांचा वर्षांव करून काश्मीर प्रश्न सुटणार नाही

इस्लामाबाद : काश्मीरमधील लोकांवर गोळ्यांचा वर्षांव करून तो प्रश्न सुटणार नाही, काश्मीर ही पाकिस्तानची जीवनरेषा असून त्या प्रश्नाचे उत्तर काश्मिरी लोकांचा आवाज ऐकून त्यांच्या आशाआकांक्षांना वाट करून देण्यातच सामावलेले आहे, असे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख राहील शरीफ यांनी संरक्षण दिनाच्या कार्यक्रमात रावळपिंडी येथे सांगितले. शत्रूच्या खुल्या व छुप्या कारवायांची आम्हाला कल्पना आहे अशी टीका त्यांनी भारताचे नाव न घेता यावेळी केली. काश्मीर खोऱ्यात सरकार पुरस्कृत दहशतवादाने, दडपशाहीने लोकांना फटका बसला आहे. लोक त्यांचे हक्क मागत असताना त्यांना दडपले जात आहे. शत्रू देशाच्या कटकारस्थानांची आम्हाला माहिती आहे. भारताचा नामोल्लेख मात्र त्यांनी टाळला.

पाकिस्तानसाठी काश्मीर ही दुखरी नस असून तेथील लोकांना आमचा राजनैतिक व नैतिक पाठिंबा आहे, असे लष्करप्रमुख जनरल राहील शरीफ यांनी सांगितले. काश्मीरमधील लोकांनी स्वयंनिर्णयाच्या हक्कासाठी दिलेल्या बलिदानास आमचा सलाम आहे. यात संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांची अंमलबजावणी करणे हा उपाय आहे. पाकिस्तानचा काश्मीरच्या लोकांना पाठिंबा आहे असे सांगून ते म्हणाले की, तेथील लोकांनी अगणित त्याग केले आहेत. काश्मीर प्रश्न हा पाकिस्तानसाठी महत्त्वाचा आहे. पाकिस्तानचे संरक्षण दल सुसज्ज आहे पण आता त्याची जाणीव जगाला होत आहे.