माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाचा अखेरचा प्रवास सुरु झाला आहे. दिल्लीतील भाजपा मुख्यालयात सुषमा स्वराज यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह भाजपाच्या प्रमुख नेत्यांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. आता काही वेळातच त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. दिल्लीतील स्मशानभूमीच्या दिशेने त्यांचे पार्थिव मार्गस्थ झाले आहे.

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, रवीशंकर प्रसाद, पियुष गोयल, जे.पी. नड्डा यांच्यासह इतर नेत्यांनी सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाला खांदा दिला. त्यांचे पार्थिव स्मशानभूमीच्या दिशेने मार्गस्थ झाले आहे. आता काही वेळातच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे निधन झाले.  त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनाचे वृत्त कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह सगळ्यांनीच शोक व्यक्त केला आणि आदरांजली वाहिली. आपल्या आक्रमकतेसाठी, कुशल वाणीसाठी आणि आपले म्हणणे ठाम पणे मांडण्यासाठी त्या प्रसिद्ध होत्या. त्यांच्याबाबत विरोधकांनाही आदर होता. गेल्या चार दशकांपासून अधिक काळ त्या राजकारणात सक्रिय होत्या. त्यांच्या जाण्याने एका झंझावाताचा अस्त झाल्याचीच भावना सगळ्यांच्या मनात आहे.