संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रशियाला रवाना झाले आहेत. भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातो आहे. रशियातल्या मॉस्को शहरात होणाऱ्या ७५ व्या विजय दिवस परेडमध्ये सहभागी होण्यासाठी ते रशियाला रवाना झाले आहेत. आपल्या देशात लॉकडाउन जाहीर केल्यानंतरचा राजनाथ सिंह यांचा हा पहिलाच दौरा आहे. भारत आणि चीन यांच्यात लडाख सीमारेषेवर तणावाचं वातावरण आहे. तणावाच्या या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह या संदर्भात रशियासोबत काही चर्चा करणार का? याकडे देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.

आपल्या तीन दिवसांच्या दौऱ्यात राजनाथ सिंह हे रशियाशी सुरक्षा विषयक धोरण या विषयावर चर्चा करणार आहेत. या दौऱ्यात ते चीनसोबत सुरु असलेल्या संघर्षाचा उल्लेख करणार का? त्यावरुन काही उभय देशांमध्ये काही महत्त्वाची चर्चा होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

भारत आणि चीन यांच्यात मागील सोमवारी गलवान खोऱ्यात जो संघर्ष झाला त्यात भारताचे २० जवान शहीद झाले. त्यानंतर चीनविरोधात देशात प्रचंड संताप आहे. चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरु लागली आहे. गलवान खोऱ्यात चीनच्या सैनिकांनी भारतीय सैनिकांवर टोकदार तारा गुंडाळलेल्या दंडुक्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात भारताच्या २० जवानांना हौतात्म्य पत्करावं लागलं. त्यामुळे संपूर्ण भारतात चीन विरोधातला राग उफाळून बाहेर आला आहे. काही ठिकाणी तर चिनी वस्तूंची होळीही करण्यात आली. इतकंच नाही तर चिनी वस्तूंची जाहिरात असलेल्या बॅनर्सना काळंही फासलं गेलं. भारत आणि चीन यांच्यातला तणाव यामुळे चांगलाच वाढला आहे. या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांचा रशिया दौरा हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आहे. या दौऱ्या दरम्यान ते रशियाशी चीनबाबत चर्चा करणार का हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.