भारत-पाकिस्तान यांच्यातील बिकानेर नजीकच्या अतिशय संवेदनशील सीमेवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हे दसरा साजरा करणार असून तेथे शस्त्रपूजा करणार आहेत. केंद्र सरकारमधील वरिष्ठ मंत्र्यांनी भारत पाकिस्तान यांच्यातील सीमेनजीक जाऊन शस्त्रपूजा करण्याची ही पहिलीच वेळ असून राजनाथ सिंह हे सीमा सुरक्षा दलाच्या जवानांसमवेत दसरा साजरा करतील. भारत पाकिस्तान सीमेवर बिकानेर नजीक १९ ऑक्टोबरला हा कार्यक्रम होणार असल्याचे गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. राजनाथ सिंह हे सीमावर्ती भागातील छावणीनजीक ही शस्त्रपूजा करणार असून रामाने रावणावर विजय मिळवल्याचे प्रतीक म्हणून दसऱ्याला शस्त्रपूजा केली जाते. ते दोन दिवस बिकानेर भेटीवर असून १८ ऑक्टोबरला एक रात्र ते छावणीत राहणार आहेत. नंतर १९ ऑक्टोबरला ते शस्त्रपूजा करतील, सिंह हे सीमेवरील सुरक्षेचा आढावाही घेणार असून तेथील पायाभूत प्रकल्पांची प्रगती तपासतील. जवानांसमेवत ते बडाखानास (मेजवानीस) उपस्थित राहणार असून सुरक्षा जवानांसमोर त्यांचे भाषण होईल. भारत पाकिस्तानची सीमा ३३२३ कि.मी लांबीची असून राजस्थानमधील सीमेवर शांतता असली तरी ती संवेदनशील आहे. काश्मीरलगतच्या सीमेवर नेहमीच प्राणहानी होत असते. गेल्या  वर्षी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी उत्तराखंडमधील भारत-चीन सीमेवर जोशीमठ येथे दसरा साजरा केला होता.