जम्मू-काश्मीर दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काश्मीर समस्या सोडवण्यापासून जगातील कोणतीही ताकद रोखू शकत नाही. असं विधान केलं आहे. तसंच, जर कोणाला चर्चेने प्रश्न सोडवायचे नसतील, तर ते कशा पद्धतीने सोडवायचे, हे आम्हाला चांगलेच ठाऊक आहे,’ असा इशारा देखील राजनाथ सिंह यांनी दिला आहे.

शनिवारी कश्मीरमध्ये विकासकामांचे उद्घाटन करताना सिंह म्हणाले की, जम्मू-काश्मीरचा प्रश्न आता लवकरच सुटेल. फुटीरवादी नेते म्हणतात की त्यांना स्वातंत्र्य हवे आहे, त्यांना पकिस्तानमध्ये जसे स्वातंत्र्य आहे तसे हवे का? ज्येष्ठ नेते फुटीरवाद्यांशी संवाद साधायला गेले परंतु त्यांनी बोलणे टाळले. आम्हाला चर्चेने प्रश्न सोडवायचे आहेत. जर कोणाला चर्चेने प्रश्न सोडवायचे नसतील तर आम्हाला चांगलंच ठाऊक आहे की, हे प्रश्न कसे सोडवायचे असतात. कश्मीर प्रश्न नक्की सुटणार. हा प्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा इतरही आपल्याकडे इतरही मार्ग आहेत. दहशतवादप्रश्नी ज्या पद्धतीने संपूर्ण इंटरनॅशनल कम्युनिटी एकत्र येत आहे, त्यामुळे काश्मीरसह संपूर्ण जगाला दहशतवादापासून मुक्ती मिळू शकते. काश्मीर खोऱ्यातील सर्व समस्यांचे निराकरण लवकरच केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. काश्मीरमध्ये जे लोक आंदोलन करत आहेत, त्यांना मी आवाहन करतो, की त्यांनी चर्चेसाठी समोर यावे. आधी प्रश्न काय आहे, तो निश्चित करा. त्यानंतर ती सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत. २०३० पर्यंत हिंदुस्थान टॉप ३ प्रमुख देशात असेल. परंतु हे लोक देशाला मागे नेत आहेत.

दरम्यान, राजनाथ सिंह यांनी जम्मू-काश्मीरमधल्या द्रास सेक्टरमधील कारगिल युद्ध स्मारकाला भेट दिली. तिथे शहीद जवांनाच्या स्मृतीस अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी ‘वीरभूमी’ला भेट दिली. तसेच कठुआमधील उंज आणि सांबा जिल्ह्यातील बसन्तर येथे बांधण्यात आलेल्या दोन पुलांचे लोकार्पणदेखील सिंह यांच्या हस्ते करण्यात आले.