काश्मीरप्रश्नी गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे सुरक्षा दलांना आदेश

हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीला ठार केल्यानंतर काश्मीरमध्ये सुरू असलेला हिंसाचार थांबविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून एका आठवडय़ामध्ये येथील परिस्थिती पूर्वपदावर आणा, असे आदेश केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सुरक्षा दलांना दिले आहेत. सिंह यांनी रविवारी आपल्या निवासस्थानी तातडीची उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी हे आदेश दिले आहेत.

या बैठकीमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल, आयबीचे प्रमुख दिनेळवर शर्मा, सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक के. के. शर्मा आणि गृहसचिव अनिल गोस्वामी उपस्थित होते. काश्मीरमध्ये चिघळलेली परिस्थिती ६५ दिवसांनंतरही कायम असल्याने केंद्र सरकारकडून येथील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी मोठय़ा प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत.  काश्मीरमधील हिंसाचारातील मृतांची संख्या ८० वर पोहोचल्याने तेथील परिस्थितीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

एका आठवडय़ामध्ये शाळा आणि इतर शैक्षणिक संस्था सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शाळा, कॉलेज तातडीने सुरू करणे गरजेचे आहे. या आठवडय़ामध्ये दुकाने आणि इतर व्यावसायिक कंपन्या पूर्ण स्वरूपात सुरू करण्याची गरज आहे. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत होईल, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

हिज्बुल मुजाहिद्दीनच्या वाटेवर अनेक तरुण

बुरहान वानी हा चकमकीत ठार झाल्यानंतर दक्षिण काश्मीरमधील अनेक तरुण बेपत्ता असून ते हिजबुल मुजाहिद्दीनमध्ये सामील झाल्याचे समजते. पुलवामा, कुलगाम, शोपिया, अनंतनाग या चार जिल्ह्य़ांत वानीच्या मृत्यूनंतर मोठय़ा प्रमाणात हिंसाचार झाला होता. सुरक्षा दलांशी युवकांचा संघर्ष वाढला होता. दक्षिण काश्मीरमधील ग्रामीण भागात नेमकी काय परिस्थिती आहे याचे चित्र स्पष्ट झालेले नाही.

तीन दहशतवादी ठार

श्रीनगर : पूंछमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडत भारतीय लष्कराने तीन दहशतवाद्यांना ठार केले. दहशतवाद्यांच्या दोन सशस्त्र गटांचा हल्ला परतवून लावताना एक पोलीस शहीद झाला असून, दोन पोलिसांसह पाच जण जखमी झाले.

पूंछच्या अल्लापीर परिसरातील लष्करी ब्रिगेडच्या मुख्यालयाजवळील ‘जोगिंदर महाल’ या इमारतीत घुसलेल्या दहशतवाद्यांच्या एका गटाने एक जोडप्याला ओलीस ठेवले. तर दहशतवाद्यांच्या दुसऱ्या गटाने पूंछच्या जिल्हा पोलीस प्रमुखांच्या कार्यालयासमोरील सचिवालयाच्या बांधकामाधीन इमारतीत घुसून हल्ला केला. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. त्यात तीन दहशतवादी ठार झाल्याचे श्रीनगर येथील लष्कर प्रवक्ते मनीष कुमार यांनी सांगितले.

दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत एक पोलीस शहीद झाला. राजिंदर कुमार असे त्याचे नाव आहे. चकमकीत मंझूर अहमद, मोहम्मद शहनाज या दोन पोलिसांसह पाच जण जखमी झाले. त्यात दोन जवानांसह एका नागरिकाचा समावेश आहे. अनेक तासांपासून सुरू असलेल्या दोन्ही ठिकाणच्या चकमकी अंतिम टप्प्यात असल्याचे पूंछचे पोलीस उपायुक्त मोहम्मद हरून मलिक यांनी सांगितले.

पुलवामामध्ये चकमकीत अनेक जखमी

श्रीनगर : काश्मीरधील पुलवामा जिल्ह्य़ात दगडफेक करणारे निदर्शक आणि सुरक्षा दल यांच्यातील चकमकीत रविवारी अनेक नागरिक जखमी झाले. करिमाबाद व आसपासच्या भागातील अनेक लोक सकाळपासून निदर्शनांसाठी रस्त्यावर आले होते. सुरक्षा दलांनी टाकलेल्या छाप्यांना त्यांचा विरोध होता. निदर्शकांनी दगडफेक सुरू केल्यानंतर सुरक्षा दलांनी अश्रुधुराची नळकांडी फोडत पेलेट गन्सचा वापर केला.