दसऱ्यानिमित्त फ्रान्समध्ये आज शस्त्रपूजन

नवी दिल्ली : फ्रान्सबरोबरचे द्विपक्षीय संबंध आणखी वृद्धिंगत होतील अशी आशा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी तीन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्य़ावर  रवाना होताना व्यक्त केली. त्यांनी ट्विट संदेशात म्हटले आहे, की वार्षिक संरक्षण संवाद  व राफेल विमानांच्या हस्तांतर कार्यक्रमास आपण उपस्थित राहणार आहोत. भारत व फ्रान्स यांच्यातील संबंधात गेल्या काही वर्षांत बरीच प्रगती  झाली असून ते आणखी सखोल होतील अशी आशा आहे.

भारतासाठी तयार करण्यात आलेल्या राफेल विमानांपैकी पहिले विमान या वेळी सुपूर्द केले जाणार असून ८ ऑक्टोबरला  राजनाथ सिंह हे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांची भेट घेणार असून नंतर ते बोर्डक्सकडे रवाना होतील. नंतर तेथील मेरीगनॅक भागात राफेल विमान हस्तांतरणाचा सोहळा होणार असून त्या वेळी फ्रोन्सच्या संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ली उपस्थित राहतील. त्याचवेळी राजनाथ सिंह हे दसऱ्याच्या निमित्ताने शस्त्रपूजन करणार असून नंतर फ्रान्सचा  वैमानिक राफेल विमानातून त्यांना सफर घडवेल. या वेळी ते मागच्या कॉकपीटमध्ये बसणार आहेत.

हवाईदल प्रमुख एअर चिफ मार्शल भदौरिया यांच्या मते एकूण ३६ राफेल विमानांच्या खरेदीचा करार  २०१६ मध्ये भारताने फ्रोन्सबरोबर केला होता. दसॉल्ट  अ‍ॅव्हीएशन ही कंपनी विमाने देणार असून त्यातील पहिले विमान मंगळवारी ताब्यात दिले जाणार आहे. राफेल विमानांचा करार साठ हजार कोटी रुपयांचा आहे.

राजनाथ सिंह हे वार्षिक संरक्षण संवाद कार्यRमात फ्रोन्सच्या लष्करी अधिकाऱ्यांसमवेत संवाद साधणार असून ९ ऑक्टोबर रोजी फ्रोन्सच्या संरक्षण उद्योग कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी बोलणार आहेत. या वेळी ते या कंपन्यांना मेक इन इंडियात सहभागी होण्याचे आवाहन करतील. लखनौ येथे पुढील वर्षी फेब्रुवारीत संरक्षण साहित्य उत्पादनांचे प्रदर्शन होत असून त्यात सहभागाचे आवाहनही ते फ्रेंच कंपन्यांना करतील.