तिहेरी तलाकच्या मुद्द्यावरून विरोधकांनी राज्यसभेत प्रचंड गदारोळ घातला. त्यामुळे राज्यसभेचं कामकाज २ जानेवारीपर्यंत स्थगित करण्यात आलं. तिहेरी तलाकचा विषय राज्यसभेत मांडण्यात येणार असल्याने विरोधक गोंधळ करणार हे अपेक्षित होते. कारण लोकसभेतही या विधेयकाला जेव्हा मंजुरी मिळाली तेव्हा काँग्रेससह अनेक विरोधकांनी सभात्याग केला होता. त्यामुळे आजही असेच काहीसे घडणार हे अपेक्षित होते आणि तसेच घडले. विरोधकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर गोंधळ घातला की राज्यसभेचे कामकाज स्थगित करावे लागले.

तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत २४५ विरूद्ध ११ अशा फरकाने मंजूर झालं. विधेयकावरील चर्चेत विविध पक्षाच्या नेत्यांनी त्यांची भूमिका मांडली. हे विधेयक कुठल्याही धर्म किंवा समाजाविरोधात नाही. महिलांचे हक्क, त्यांच्या सन्मानासाठी असल्याचं कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी लोकसभेत म्हटलं होतं. लोकसभेतही विरोधकांनी गोंधळ घातला होता. मात्र राज्यसभेत विरोधक आणि सत्ताधारी यांनी या विधेयकासंदर्भातही जय्यत तयारी केली होती. तरीही विधेयक मांडतात राज्यसभेत खासदारांनी प्रचंड गदारोळ घातला. सुरुवातीला एक-दोनदा कामकाज स्थगित करून पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न झाला. मात्र विरोधक हट्टाला पेटल्याने राज्यसभेचं कामकाज अखेर २ जानेवारीपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे.