राज्यसभेमध्ये केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी चाइल्ड इंडिया फाउंडेशनला १ मार्च २०२० ते १५ सप्टेंबर २०२० दरम्यान लहान मुलांवरील लैंगिक अत्याचारासंदर्भातील तीन हजार ९४१ कॉल असल्याची माहिती दिली आहे. इराणी यांनी लैंगिक शोषणासंदर्भात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरामध्ये सविस्तर आकडेवारी दिली आहे. लैंगिक शोषणासंदर्भातील लेखी स्वरुपात माहिती देताना राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या आकडेवारीनुसार १ मार्च २०२० ते ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत लैंगिक शोषणाची प्रकरणं उघडकीस आली आहेत.

राष्ट्रीय गुन्हे नोंदणीकरण विभागाकडील (एनसीआरबी) माहितीनुसार १ मार्च २०२० ते १८ सप्टेंबर २०२० पर्यंत राष्ट्रीय सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर दाखल करण्यात आलेल्या चाइल्ड पोर्नोग्राफी तसेच बलात्कार आणि सामूहिक बलत्कारांसंदर्भातील तक्रारींची संख्या १३ हजार २४४ इतकी आहे.

२०१८ मध्ये ऑगस्ट महिन्यापर्यंत २.३९ कोटी तक्रारी

यापूर्वी इराणी यांनी सभागृहाला दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारच्या चाइल्ड हेल्पलाइन सेवेवर वर्ष २०१८ मध्ये ऑगस्ट महिन्यापर्यंत २.३९ कोटी तक्रारी आल्या होत्या. याचबरोबर लॉकडाउनच्या कालावधीमध्ये म्हणजेच एप्रिल ते जून महिन्यामध्ये घरगुती हिंसाचारासंदर्भातील दोन हजार ८७८ तक्रारींचे निराकरण करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री असणाऱ्या इराणी यांनि दीली आहे. यापूर्वी गुरुवारी दिलेल्या एका उत्तरामध्ये इराणी यांनी खास मुलांच्या समस्यांसाठी जारी करण्यात आलेल्या चाइल्डलाइन नावाच्या हेल्पलाइनवर वर्ष २०१८ मध्ये १ कोटी १२ लाख कॉल असल्याचे सांगितले आहे. २०१९ मध्ये चाइल्ड हेल्पलाइनवर ७८ लाख ६४ हजार तर २०२० मध्ये ४८ लाख १८ हजार कॉल आले.

आकडेवारीनुसार २०१८ पासून हेल्पलाइनवर एकूण दोन कोटी ३९ लाख ७० हजार ६२४ कॉल आले आहेत. केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या कालावधीमध्ये मुलांसाठी चालवी जाणारी ही चाइल्ड हेल्पलाइन सेवा ४१३ जिल्ह्यांमध्ये उपलब्ध आहे. १५ सप्टेंबर रोजी आणखीन दिडशेहून अधिक जिल्ह्यांमध्ये ही सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सध्या देशातील ५९४ जिल्ह्यांमध्ये ही सेवा उपलब्ध आहे. चाइल्डलाइनवर एखादी तक्रार मिळाल्यानंतर मदत करणारी तुकडी जास्तीत जास्त ६० मिनिटांमध्ये घटनास्थळी दाखल होते.