रामजन्मभूमी ट्रस्टकडून कराराचा सविस्तर तपशील जारी

नवी दिल्ली : अयोध्येतील जमीन खरेदीबाबत आरोप करण्यात येत असतानाच राम जन्मभूमी ट्रस्टने खरेदी करार आणि करारातील सविस्तर तपशील या बाबतचे एक निवेदन मंगळवारी जारी केले आणि जमीन खरेदी करार पारदर्शक पद्धतीने करण्यात आल्याचे स्पष्ट केले.

या करारामध्ये नऊ व्यक्ती सहभागी झाल्या होत्या आणि त्यांच्या संमतीने करार पारदर्शकपणे पूर्ण करण्यात आला, सर्व आर्थिक व्यवहार बँकेमार्फत करण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला आणि कराराची अधिकृत नोंद करण्यात आली आहे, असेही ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले.

ही जमीन खरेदी करण्यास प्रथम न्यासाला स्वारस्य होते, परंतु जमिनीची मालकी स्पष्ट व्हावी यासाठी न्यासला यापूर्वीच्या करारांना अंतिम स्वरूप द्यावयाचे होते, गेल्या १० वर्षांपासून जवळपास नऊ व्यक्ती करारात सहभागी होत्या आणि त्यापैकी तीन व्यक्ती मुस्लीम आहेत. या सर्वाशी संपर्क साधण्यात आला आणि चर्चा करण्यात आली. त्यांची मान्यता मिळाल्यावर ते पूर्वीच्या करारांबाबत निर्णय घेण्यासाठी एकत्र आले. जमिनीच्या अंतिम मालकांसमवेत पारदर्शक पद्धतीने करार करण्यात आला, असे निवेदनामध्ये म्हटले आहे.