पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने बलात्कारप्रकरणातील एका आरोपीला ९० लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. तो दंड वसूल करण्यासाठी आता आरोपी आणि आरोपीच्या आईच्या संपत्तीचा लिलाव होणार आहे. आरोपी निसान सिंग आणि आरोपीची आई नवज्योत कौर यांच्याकडून हा दंड वसूल करण्यासाठी आता फरीदकोट जिल्हा प्रशासन त्यांच्या संपत्तीचा २९ ऑक्टोबरला लिलाव करणार आहे.

जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, निसान आणि त्याच्या आईच्या संपत्तीचे प्रशासनाने मुल्यांकन केले आहे. त्यांच्याकडे ३.५ एकर शेती आणि १.५ एकर निवासी जागा आहे. या जागेचा लिलाव करुन प्रशासन पीडित आणि तिच्या कुटुंबीयांना दंडाची रक्कम देईल.

दि. ३१ ऑगस्ट २०१९ रोजी न्या. ए बी चौधरी आणि न्या. इंद्रजित सिंग यांच्या दुहेरी खंडपीठाने निसान आणि त्यांच्या आईला पीडितेला ५० लाख रुपये आणि तिच्या पालकांना २० लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला होता. आरोपीची संपत्ती जप्त करुन पीडितेला नुकसान भरपाई द्यावी असा आदेश न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला दिला होता. ही प्रक्रिया दहा आठवड्यात पूर्ण करुन न्यायालयाला पुन्हा एकदा माहिती देण्याचे आदेश दिले होते. फरिदकोटचे उपायुक्त राजीव पराशर यांनी लिलावासाठी २९ ऑक्टोबर तारीख निश्चित केल्याचे म्हटले आहे.

काय आहे प्रकरण..

फरीदकोट येथे राहणाऱ्या निसानने २५ जून २०१२ ला एका दहावीतील मुलीचे अपहरण केले होते. पीडित मुलगी २७ जुलै २०१२ मध्ये त्याच्या तावडीतून सुटून घरी पोहोचली होती. त्यानंतर एका महिन्यानंतर निसानने आपल्या दोन मित्रांबरोबर २४ सप्टेंबर २०१२ ला पुन्हा एकदा मुलीचे अपहरण केले आणि तिच्या आईलाही त्रास दिला होता. याप्रकरणी पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते. निसानला याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. तर त्याची आई आणि इतर सहकाऱ्यांना ७ वर्षांची शिक्षा झाली होती.