तब्बल तीन दशकांनंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पहिल्यांदाच सोन्याची विक्री सुरू केली असून बँकेने जालान समितीच्या शिफारशी स्वीकारल्यानंतर यावर्षी ऑगस्ट महिन्यापासून सोन्याच्या ट्रेडिंगमध्येही सक्रीय झाल्याचं वृत्त दोन दिवसांपासून माध्यमांमध्ये येत आहे. त्याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

“आरबीआय सोन्याची विक्री किंवा व्यापार करत असल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलंय. पण आरबीआयकडून अशाप्रकारे कोणतंही सोनं विकण्यात आलेलं नाही किंवा सोन्याचा व्यापार देखील आरबीआय करत नाही”, असं बँकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. ट्विटरद्वारे आरबीआयने हे स्पष्टीकरण दिलं. अशाप्रकारचं वृत्त म्हणजे केवळ अफवा असल्याचं बँकेने स्पष्ट केलं आहे.

‘आरबीआयने जुलै महिन्यापासून एकूण ५.१ अब्ज डॉलरचं सोनं खरेदी केलंय, तर १.१५ अब्ज डॉलर सोन्याची विक्री केली आहे. आरबीआयकडे ऑगस्टच्या अखेरपर्यंत १९.८७ दशलक्ष औंस कोटी सोनं होतं. तर, ११ ऑक्टोबर रोजी फॉरेक्स रिझर्व्हमध्ये केवळ २६.७ अब्ज डॉलर सोनं होतं’, असं दोन दिवसांपूर्वी आलेल्या वृत्तात म्हटलं होतं. याशिवाय सोन्याच्या विक्रीतून निर्धारीत लाभापेक्षा जास्त लाभ सरकारसोबत आरबीआय शेअर करणार असल्याचंही या वृत्तात म्हटलं होतं. पण, आरबीआयने हे वृत्त फेटाळून लावलं असून या केवळ अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे.