लक्ष्मी विलास बँक आर्थिक संकटात सापडल्याने आरबीआयने या बँकेवर निर्बंध लादले आहेत. १६ डिसेंबरपर्यंत म्हणजेच पुढील ३० दिवस हे निर्बंध लादण्यात आले आहेत. या कारवाईमुळे लक्ष्मी विलास बँकेच्या खातेदरांना महिनाभरासाठी फक्त २५ हजारांची रोख रक्कम काढता येणार आहे. एएनआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून लक्ष्मी विलास बँकेवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

मागील तीन वर्षे लक्ष्मी विलास बँकेला मोठ्या प्रमाणावर तोटा झाला आहे. अवाजवी कर्जवाटप, अनियमितता या सगळ्यामुळे लक्ष्मी विलास बँकेवर आर्थिक संकट आले आहे. त्यामुळेच आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने लक्ष्मी विलास बँकेवर निर्बंध लादले आहेत.

बँकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. गेल्या तीन वर्षांपासून अकाऊंट बुक्सही कमकुवत आहेत. बुडीत कर्जे आणि सुशासनाचा अभाव यामुळे एकापाठोपाठ एक बँका डबघाईला येत आहेत. याआधी पंजाब महाराष्ट्र बँक आणि येस बँक यांच्यातील अनियमितता यामुळे आरबीआयला त्यांच्यावर निर्बंध लादावे लागले होते. पंजाब महाराष्ट्र को ऑप. बँकेवरचे निर्बंध अद्यापही कायम आहेत. त्यामुळे खातेदरांना हाल सहन करावे लागत आहेत.

आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून लक्ष्मी विलास बँकेवर पुढील महिनाभरासाठी मोरॅटिरियम लागू करण्यात आल्याचं आरबीआयने म्हटलं आहे. याबाबत आज अध्यादेश काढण्यात आला त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.