रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पाचशे रुपयांची नवी नोट बाजारात आणणार आहे. पाचशे रुपयांच्या नव्या नोटांवर ए हे इनसेट अक्षर असणार आहे. पाचशे रुपयांच्या नव्या नोटा बाजारात आल्यावरही पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा चलनात कायम राहतील, असे रिझर्व्ह बँकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. इंडिया टुडेने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदीची घोषणा केली होती. पंतप्रधान मोदींच्या निर्णयामुळे पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद झाल्या होत्या. यानंतर रिझर्व्ह बँकेने पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या होत्या. रिझर्व्ह बँकेने नोटाबंदीनंतर जारी केलेल्या पाचशे रुपयांच्या नोटा चलनात कायम राहणार आहेत. रिझर्व्ह बँकेकडून आता चलनात आणल्या जाणाऱ्या पाचशे रुपयांची रचना सध्या चलनात असलेल्या पाचशे रुपयांच्या नोटांसारखीच असणार आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पाचशे रुपयांच्या नव्या नोटा महात्मा गांधी (नव्या) मालिकेतील असणार आहेत.

‘पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणल्यानंतर इतर कोणत्याही मूल्यांच्या नोटा बाजारात आणण्याचा मानस नाही,’ असे रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एन. एस. विश्वनाथन यांनी म्हटले आहे. लोकांनी कॅशलेस व्यवहार करावेत, यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहितीदेखील विश्वनाथन यांनी सांगितले. ‘पाच हजार आणि दहा हजार रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नाही,’ अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी संसदेला दिली आहे.