देशभरात दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ होत असताना आंध्र प्रदेशचे मुख्यंमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रति लिटर दोन रुपयांची कपात केल्याची घोषणा केली. नायडू यांनी सोमवारी दुपारी विधानसभेत ही घोषणा केली. आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. इंधनाच्या वाढत्या दरांमुळे सामान्य जनता भरडली जात आहे. केंद्रानेही इंधनाच्या किंमती कमी करून जनतेला दिलासा द्यावा, असे आवाहन नायडू यांनी यावेळी केले.

या निर्णयाचा राज्याच्या तिजोरीवर भार पडणार असून राज्याच्या महसुलात घट होऊन १,१२० कोटींचा फटका बसणार आहे. पेट्रोलवर सर्वाधिक व्हॅट वसूल करण्यामध्ये आंध्र प्रदेशचा तिसरा क्रमांक लागतो, महाराष्ट्राचा याबाबतीत पहिला क्रमांक आहे. तर डिझेलवर व्हॅट आकारण्यात आंध्र प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. आंध्र प्रदेशमध्ये पेट्रोलवर 35.77 टक्के आणि डिझेलवर 28.08 टक्के व्हॅट आकारला जातो.

दुसरीकडे, आज सलग १७ व्या दिवशी देशात इंधन दरवाढ झाली आहे. पेट्रोल १४ तर डिझेल १५ पैशांनी महागलं आहे. यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर ८८.२६ रुपये प्रतिलिटर झला असून डिझेलचा दर ७७.४७ रुपये प्रतिलिटर झाला आहे.