प्रसिद्धीपत्रकाचा यापुढे दहा भाषांमधून अनुवाद

बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीने भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव केल्यामुळे काँग्रेसमध्ये प्रथमच प्रादेशिक भाषांतील प्रसारमाध्यमांना महत्त्व प्राप्त झाले आहे. यापुढे काँग्रेसकडून प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकाचा इंग्रजी-हिंदूी अनुवाद करून प्रादेशिक भाषांमधील प्रसारमाध्यमांना देण्यात येणार आहे. एकाच वेळी किमान दहा भाषांमध्ये या पत्रकाचा अनुवाद करू शकणाऱ्या कंपनीच्या शोधात सध्या काँग्रेसच्या प्रसारमाध्यम विभागाचे प्रमुख रणदीप सुर्जेवाला आहेत. हिंदी व इंग्रजी प्रसारमाध्यमांचा आवाका मोठा असला तरी प्रादेशिक भाषांमधील प्रसारमाध्यमांचे वर्चस्व निर्विवाद आहे. आम्हाला ज्यांच्यापर्यंत पोहोचायचे आहे, त्यांच्यापर्यंत प्रादेशिक प्रसारमाध्यमेच पोहचू शकतात, अशा शब्दात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने प्रतिक्रिया दिली.

काँग्रेस नेत्यांची पत्रकार परिषद, महत्त्वाची घोषणा, भूमिका आदी प्रतिक्रिया इंग्रजी भाषेतून प्रसारमाध्यमांना लेखी स्वरूपात दिली जाते. यापुढे त्याचा अनुवाद करण्यात येईल. परंतु केवळ भाषिक जाणकारांची याकामी मदत घेतली जाणार नाही. केलेला अनुवाद राजकीयदृष्टय़ा बरोबर आहे अथवा नाही, याची खातरजमा करण्यासाठी प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांची मदत घेण्यात येणार आहे.

प्रसारमाध्यम हा एकमेव विभाग असा आहे ज्यांना विभागांतर्गत पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करता येत नाही. केंद्रीय प्रसारमाध्यम विभागांतर्गत नियुक्ती करण्यासाठी सुर्जेवाला पक्ष उपाध्यक्ष राहुल गांधी यांना प्रस्ताव देणार आहेत. काँग्रेसने ओडिया, तमिळ, मल्यालम, गुजराथी, मराठी, कन्नड, बंगाली, पंजाबी व असामी भाषेत प्रसिद्धीवृत्त देण्याचा निर्णय घेतला आहे. पगारी माणसे ठेवल्यास त्यांच्यात समन्वयाचा अभाव असेल. एकाच कंपनीला कंत्राट देण्याच्या प्रयत्नात काँग्रेसचा प्रसारमाध्यम विभाग आहे