देशात प्रादेशिक पातळीवर अनेक अनुभवी आणि क्षमता असलेले नेते असून ते पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकतात, असे माजी पंतप्रधान आणि जद(एस)चे अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांनी म्हटले आहे.
देशाचा कारभार राष्ट्रीय पातळीवरील पक्षांनीच करण्याची मक्तेदारी नाही, देशात प्रादेशिक पातळीवरही अनेक नेते असून त्यांच्याकडे क्षमता आणि अनुभवाची शिदोरी आहे, देशासाठी ते उत्तम कार्य करू शकतात, गुजरातच्या विकासापेक्षाही जास्त काम करण्याची त्यांच्यात क्षमता आहे, असेही देवेगौडा यांनी म्हटले आहे. पुरेसा वेळ दिल्यास प्रादेशिक पक्ष आणि डावे पक्ष एकत्रित येऊन उत्तम शासन देऊन त्याचे निकाल दाखवून देऊन शकतात. बिगर काँग्रेस आणि बिगर भाजप पक्षांच्या नेत्यांची बुधवारी दिल्लीत बैठक होणार असून आघाडी स्थापन करण्याबाबत एका उपसमितीची स्थापना करण्यात येणार आहे. त्याला आपण राष्ट्रीय आघाडी अथवा तिसरी आघाडी म्हणू शकतो, असेही देवेगौडा यांनी वार्ताहरांना सांगितले.
देशाचा भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील की राहुल गांधी याबाबत चर्चा करण्यात आपल्याला स्वारस्य नाही, आपल्याला भविष्यातील सरकार आणि प्रादेशिक पक्षांचा दर्जा याची काळजी आहे, असेही माजी पंतप्रधान म्हणाले. भविष्यात राजकीय ध्रुवीकरण होणार असून ते कोणालाही टाळता येणे शक्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.