लाहोर कारागृहात भारतीय कैद्याच्या झालेल्या मृत्यूची उच्चस्तरिय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षामंत्री रेहमान मलिक यांनी सोमवारी दिली. चॅम्बैल सिंग असे मृत्युमुखी पडलेल्या कैद्याचे नाव आहे.
लाहोर कारागृहातील कैद्यांनी सिंग यांच्यावर गेल्या महिन्यात हल्ला केला होता. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात केंद्रीय तपास पथकाकडून चौकशीचे आदेश दिले असल्याचे मलिक यांनी ट्विट केले.
सिंग यांचा खून करण्यात आल्याचा आरोप करणारा ट्विट एका भारतीय व्यक्तीने केला होता. त्यालाच रिट्विट करताना मलिक यांनी चौकशीची माहिती दिली.
सिंग यांना कोटलखपत कारागृहातील कर्मचाऱयांनी मारहाण केली होती. त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप लाहोर कारागृहातील अन्य एक कैदी तेहसीन खान यांनी केला होता. त्यामुळे या प्रकरणाची आधीपासूनच न्यायालयीन चौकशी सुरू आहे.