पश्चिम बंगालमधील किमान पन्नास महाविद्यालयांच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील अर्जात विद्यार्थ्यांना त्यांचा धर्म जाहीर न करण्याची मुभा देण्यात आली आहे.

मानवता, अज्ञेयवादी, धर्मनिरपेक्ष, निधर्मा असे वेगवेगळे पर्याय धर्म या स्तंभापुढे देण्यात आले आहेत. त्यामुळे पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी या महाविद्यालयात मुलांना त्यांचा धर्म न सांगण्याची मुभा दिल्याने त्यांची एक मागणी पूर्ण झाली आहे, असे बेथुन कॉलेजने म्हटले आहे. अनेक विद्यार्थ्यांंनी महाविद्यालयीन प्रवेशावेळी त्यांची धार्मिक ओळख उघड करण्यास  विरोध दर्शवला होता. हे विद्यार्थी यापूर्वीही धर्म या स्तंभासमोर कुठल्याही धर्मावर विश्वास नाही, असेच लिहीत असत. त्यानंतर महाविद्यालयांच्या अधिकाऱ्यांनी मानवता हा नवा पर्याय विद्यार्थ्यांना धर्मासाठी दिला.  त्यानंतर स्कॉटिश चर्च कॉलेज व इतर महाविद्यालयांनी ‘अज्ञेयवादी’, ‘निधर्मी’, ‘धर्मनिरपेक्ष’ असे पर्याय दिले आहेत. मौलाना आझाद कॉलेज, राममोहन कॉलेज, बंगबासी मॉर्निग, महाराजा श्रीचंद्र कॉलेज (आंदूल, जि.हावडा), मिदनापूर कॉलेज यांनी धर्मासाठी ‘मानवता’ हा पर्याय दिला आहे. विद्यार्थी व शिक्षणतज्ज्ञांच्या मते ‘मानवता’ ऐवजी ‘मानवतावाद’ असा पर्याय देणे योग्य ठरेल. इंग्रजी विषयाची विद्यार्थिनी सागरिका सेन हिने सांगितले की, ‘‘हा ऐतिहासिक निर्णय आहे. मी हिंदूू आहे पण ही ओळख सांगणे मला योग्य वाटत नाही.’’