रिझर्व बँकेचा पुढाकार

अंधांना चलनी नोटा सहज ओळखता याव्यात, यासाठी एक अनुप्रयोग (अ‍ॅप्लिकेशन) रिझर्व बँक ऑफ इंडियाने विकसित करण्याचे ठरवले असून सध्यातरी रोखीच्या व्यवहारांना महत्त्व असल्याने त्याचा वापर करता येणार आहे.

सध्या १०, २०, ५०, १००, २००, ५००, २००० या नोटा चलनात असून एक रुपयाची नोट केंद्राने जारी केली आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे, की नोटा ओळखणे अंधांना सोपे नसते. त्यामुळे या नोटांमधील खुणांच्या माध्यमातून त्या ओळखणे आवश्यक असते त्यासाठी १०० व त्यावरील चलनाच्या नोटात अंधांसाठी खास ओळख पटवणाऱ्या सुविधा आहेत पण त्या त्यांना माहिती नाहीत. नोव्हेंबर २०१६ मध्ये निश्चलनीकरणानंतर पाचशे व हजाराच्या नोटा बाद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर पाचशे व दोन हजाराच्या नवीन नोटा चलनात आल्या.

अंधांना या नोटा ओळखता याव्यात यासाठी रिझर्व बँक प्रयत्नशील आहे. महात्मा गांधी मालिका व महात्मा गांधी नवी मालिका यातील नोटांच्या प्रतिमा  घेऊन प्रस्तावित मोबाइल अनुप्रयोगासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.

या अनुप्रयोगात ध्वनीच्या माध्यमातून सूचनेचा पर्याय राहील. त्यात प्रतिमा योग्य प्रकारे घेतली तर ती नोट कुठल्या किमतीची आहे हे समजू शकेल. देशात ८० लाख अंध लोक असून त्यांना या अनुप्रयोगाचा फायदा होणार आहे. जून २०१८ मध्ये बँकेने अंधांना नोटा ओळखता याव्यात, यासाठी उपकरण किंवा अनुप्रयोग तयार करण्याचे सूतोवाच केले होते. दुकानदारांनीच अंधांना असा प्रकारचे अ‍ॅप (अनुप्रयोग) उपलब्ध करून द्यावे, अशी सूचनाही आधी बँकेने मांडली होती.