News Flash

जम्मू-काश्मीरमधील निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल

जम्मू आणि काश्मीरमधील विविध निर्बंध टप्प्याटप्प्याने हटविले जात असून जनजीवन सुरळीत आहे

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील विविध निर्बंध टप्प्याटप्प्याने हटविले जात असून जनजीवन सुरळीत आहे,  अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव बी. व्ही. आर. सुब्रमण्यम यांनी शुक्रवारी श्रीनगर येथे पत्रकार परिषदेत दिली.

सरकारी कार्यालये शुक्रवारी उघडली असून शाळा पुढील आठवडय़ात उघडणार आहेत.  लोकांच्या संचारावरील निर्बंध निवळले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर पाच ऑगस्टपासून गेले १२ दिवस राज्यातील जनजीवन बंदिस्त झाले होते. तेथील र्निबधांना सर्वोच्च न्यायालयातही आव्हान देण्यात आले आहे. या पाश्र्वभूमीवर  मुख्य सचिवांनी सांगितले की, दहशतवादी संघटनांनी काश्मीर अशांत करण्याचा प्रयत्न केला, पण तो हाणून पाडला गेला. गेल्या १२ दिवसांत हिंसाचाराची वा जीवितहानीची एकही मोठी घटना घडलेली नाही. राज्याच्या १२ जिल्ह्य़ांमध्ये जनजीवन सुरळीत असून केवळ पाच जिल्ह्य़ांत रात्री किमान निर्बंध असल्याची माहितीही त्यांनी दिली.शुक्रवारचा नमाजही ठिकठिकाणी शांततेत झाला. तसेच सरकारी कार्यालयांतही उपस्थिती लक्षणीय होती. आता शांतता प्रस्थापित करण्यासाठी लोक जितका पुढाकार घेतील तितके निर्बंध शिथिल होतील, असे त्यांनी सांगितले. अतिरेक्यांना संपर्काचा लाभ घेता येऊ नये म्हणून मोबाइलसेवा पूर्ण बंद ठेवली गेली आहे. पण काही दिवसांत ती पूर्ववत होईल. दूरध्वनीसेवा मात्र शुक्रवार रात्रीपासूनच विभागवार पूर्ववत होत असून शनिवारी श्रीनगरमधील दूरध्वनी सुरू झाले असतील, असेही त्यांनी सांगितले.

सर्व प्रमुख वृत्तपत्रांचे प्रकाशन सुरू आहे आणि केबल दूरचित्रवाणी वाहिन्याही सुरू आहेत, असे ते म्हणाले.खासगी वाहतूक मोठय़ा प्रमाणात सुरू झाली असून काही दिवसांत सार्वजनिक वाहतूकही पूर्ववत केली जाणार आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. हाज यात्रेकरूंना कोणताही अटकाव कुठेही केला जात नसून जीवनावश्यक वस्तू आणि औषधांचा पुरवठाही सुरळीत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2019 5:20 am

Web Title: restrictions in jammu and kashmir relax slowly zws 70
Next Stories
1 काश्मीरमधील निर्बंधांबाबत तूर्त हस्तक्षेप नाही
2 पहलू खान प्रकरण : आरोपी सुटण्यास राज्य सरकार जबाबदार – मायावती
3 काश्मीरबाबतचा निर्णय महत्त्वाचा टप्पा ; गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन
Just Now!
X