नोटबंदीचा आणखी एक बळी उत्तर प्रदेशात गेला आहे. मुलीच्या लग्नासाठी पैसे काढण्यासाठी ८ तास बँकेच्या बाहेर रांगेत उभ्या असलेल्या एका सेवानिवृत्त शिक्षकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील जालौन जिल्ह्यात घडली. बँकेतून पैसे काढून ७० वर्षीय रघुनाथ वर्मा यांना मुलीच्या साखरपुड्यासाठी मध्य प्रदेशातील भीड येथे जायचे होते. त्यांच्या मुलीचा १६ नोव्हेंबर रोजी साखरपुडा होता. वर्मा हे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माधोगड शाखेत सकाळीच पैसे काढण्यासाठी गेले होते. परंतु काऊंटरवर आधीपासून सुमारे एक हजाराहून अधिक लोक रांगेत उभे होते. संर्पूण दिवसभर ते पैसे लवकर देण्यासाठी बँकेच्या अधिकाऱ्यांना विनंती करत होते. रघुनाथ यांचा मुलगा रवी याने हिंदुस्तान टाइम्सला याची माहिती दिली. आम्हाला लग्न खर्चासाठी २ लाख रूपयांची गरज होती. माझे वडील तीन दिवस बँकेत गेले. त्यांनी अनेकवेळा बँकेच्या व्यवस्थापकांना पैसे काढण्यासाठी व नोट बदलण्यासाठी विनंती केली. परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. शनिवारी तर त्यांनी व्यवस्थापकाचे पाय धरले होते. ८ तास रांगेत उभे राहिल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला व ते तिथेच पडले. त्यांना जवळच्या रूग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
केंद्र सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयानंतर सहा दिवसांत आतापर्यंत बँकेच्या चकरा मारणाऱ्या २५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमध्येच ७ जणांचा बळी गेला आहे. उत्तर प्रदेशमधील बुलंद शहरातील कैलाश रूग्णालयात उपचार न केल्यामुळे एका चिमुकल्याचा मृत्यू झाला. मुलाच्या कुटुंबीयांकडे रूग्णालयाचे पैसे देण्यासाठी नव्या नोटा नसल्यामुळे रूग्णालयाने उपचार करण्यास नकार दिला होता. तर यूपीतीलच शामली भागात भावाला नव्या नोटा बदलून न मिळाल्यामुळे एका २० वर्षीय मुलीने आत्महत्या केली होती. कानपूर येथील एक महिलेचा नोटा मोजताना मृत्यू झाला होता. पोलिसांना तिच्याकडून २.६९ लाख रूपये आढळले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नोटबंदीचा निर्णय जाहीर करत असतानाच कानपूर येथेच एका व्यक्तीचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता.