औषध निर्माण क्षेत्रातील नामांकित कंपनी असलेल्या रॅनबॅक्सीचे माजी प्रवर्तक मलविंदर सिंह यांना मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली आहे. रेलिगेयर फिनवेस्ट लिमिटेडटच्या (आरएफएल) फंडमध्ये करण्यात आलेल्या २३०० कोटींच्या गैरव्यवहाराप्रकरणी ही अटकेची कारवाई करण्यात आली. मलविंदर सिंह यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) अटक करण्यात आली आहे . मलविंदर सिंह यांच्यासोबत रेलिगेयर एंटरप्रायजेजचे माजी सीएमडी सुनील गोधवानी यांनाही अटक करण्यात आली आहे.

आरोप आहे की, मलविंदर सिंह आणि सुनील गोधवानी यांनी आरएफएलच्या फंडमध्ये घोटाळा केला असून यामुळे २३९७ कोटींचं नुकसान झालं. ईडीने तिहार जेलमधून दोघांचाही ताबा घेतला आहे. सध्या एका घोटाळ्याप्रकरणी दोघेही तिहार जेलमध्ये असून तिथेच ईडीने त्यांना अटक केली असल्याची माहिती प्रकरणाशी संबंधित वकिलाने दिली आहे. सिंह आणि गोधवानी दोघांनाही कारागृहात महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात येणार आहे. यावेळी ईडी चौकशीसाठी त्यांच्या कोठडीची मागणी करणार आहे.

ऑक्टोबर महिन्यात दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मलविंदर यांना त्यांचा भाऊ शिविंदर, गोधवानी, कवी अरोरा आणि अनिल सक्सेना यांना अटक केली होती. डिसेंबर २०१८ मध्ये रेलिगेयर फिनवेस्ट लिमिटेडने दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली होती. त्यासंदर्भात आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. चौकशी झाल्यानंतर त्या दोघांनाही पोलिसांनी जेरबंद केलं.