प्रवासात हस्तमैथून करणाऱ्या रिक्षाचालकाला पाकिस्तानमधील एका तरुणीने चांगलाच धडा शिकवला आहे. तरुणीने फक्त त्या रिक्षाचालकाचा व्हिडीओ शूट केला नाही, तर त्याला पोलीस स्टेशनजवळ रिक्षा थांबवण्यास भाग पाडून चांगलाच चोप दिला. तरुणीने फेसबुकच्या माध्यमातून घटनेसंबंधी सविस्तर माहिती दिली असून ही पोस्ट व्हायरल झाली आहे. शाहताज कादिर असं या महिलेचं नाव असून इंडियन एक्स्प्रेसने त्यांच्याशी संपर्क साधत घटनेसंबंधी जाणून घेतलं.

यासंबंधी पोलीस तक्रार दाखल केली का असं विचारलं असता २४ वर्षीय तरुणीने आपण रिक्षाचा रजिस्ट्रेशन नंबर पाहू शकलो नसल्याचं सांगितलं. त्याने मला धक्का देऊन पळ काढला असं तरुणीने सांगितलं आहे.

तरुणीने फेसबुकवर पोस्ट करताच तिला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. ‘सोशल मीडियावर अनेकांनी मला पाठिंबा दिला, तर काहीजणांनी विरोधही केला. पाठिंबा देणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या जास्त होती. पण अनेक पुरुष माझ्यावरच आरोप करत होते. काहीजणांनी तर चक्क रिक्षाचालकाची बाजू घेतली’, असं तरुणीने सांगितलं आहे. तरुणी सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह असून कराचीत राहते.

तरुणीने रिक्षाचालकाचा व्हिडीओही फेसबुकवर शेअर केला आहे. सोबतच तिेने तरुणींनी कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे हेदेखील सांगितलं आहे.