बुलंदशहरचा हिंसाचार ताजा असतानाच उत्तर प्रदेशात जमावाच्या हिंसाचारात आणखी एका पोलिसाचा बळी गेला. गाझीपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर परतणाऱ्या वाहनांवर निदर्शकांनी केलेल्या गोळीबारात एक पोलीस शिपाई ठार झाला.

राष्ट्रीय निषाद पक्षाचे कार्यकर्ते नौनेरा भागात पोलीस ठाण्याजवळ निदर्शने करत होते. पोलिसांनी त्यांना सभास्थळी जाण्यापासून रोखले होते. पंतप्रधान गाझीपूरहून रवाना झाल्यानंतर या कार्यकर्त्यांनी निरनिराळ्या ठिकाणी वाहतूक रोखली आणि सभास्थळावरून परतणाऱ्या वाहनांवर दगडफेक सुरू केली. यावेळी वाहतूक सुरळीत करण्यासाठी गेलेल्या सुरेश वत्स (४८) या शिपायाच्या डोक्यावर दगड आदळला, असे पोलीस अधीक्षक यशवीर सिंह यांनी सांगितले.

सुरेश यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र दाखल करून घेण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी १५ कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुरेश यांच्या पत्नीला ४० लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली आहे.

राज्यात जमावाच्या हिंसाचारात पोलीस मृत्यृ मुखी पडण्याची एका महिन्यातील ही दुसरी घटना आहे. बुलंदशहरमध्ये गोहत्येच्या संशयावरून झालेल्या हिंसाचारात पोलीस निरीक्षक सुबोध कुमार सिंह आणि एक स्थानिक तरुण सुमित कुमार या दोघांचा मृत्यू झाला होता.